Private Advt

गाडर्‍यातील आदिवासी तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू

यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गाडर्‍या गावातील 24 वर्षीय आदिवासी तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फुगली भाया बारेला (24, गाडर्‍या, ता.यावल) असे मयत तरुणीचे नाव आहे.

शेतात झाला सर्पदंश
फुगली भाया बारेला ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. नेहमीप्रमाणे गाडर्‍या शिवारातील शेतात मंगळवार, 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता कुटुंबियांसह तूर कापण्यासाठी शेतात गेली असता तिला विषारी सापाने दंश केल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच भरत बारेला, पोलिस पाटील तेरसिंग बारेला व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडर्‍या गाव हे अतिदुर्गम भागातील आदिवासी गाव असल्याने मृतदेह आणण्यासाठी खाजगी वाहनाने 80 किलोमीटर अंतरासाठी सहा तास लागले. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस पाटील तेरसिंग बारेला यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.