गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; आणखी काही नेत्यांचा सोनिया गांधींना पत्र

0

लखनऊ: २०१४ आणि त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात कॉंग्रेसला जोरदार फटका बसला. कॉंग्रेसकडे नेतृत्वाची कमी असल्याचे सातत्याने आरोप होत आहे. गांधी घराण्याबाहेरील नेत्याने नेतृत्व करावे अशी मागणीही पुढे आली आहे. त्यातूनच गेल्या महिन्यात देशभरातल्या काँग्रेसच्या २३ नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले ह्तोये. या पत्रानंतर कॉंग्रेसमध्ये मोठे घमासान पाहायला मिळाले. पक्षाची मोठी बदनामी देखील झाली. हे प्रकरण अद्याप शांत झालेले नसतांना उत्तर प्रदेशातल्या कॉंग्रेसच्या ९ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवले आहे.

गेल्या वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या ९ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवले आहे. कुटुंबा बाहेर पडून काम करा, अन्यथा पक्ष इतिहास जमा होईल, अशी रोखठोक भाषा पत्रात वापरण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाची अवस्था अतिशय वाईट आहे. राज्यात काँग्रेसची अवस्था आतापर्यंत कधीच इतकी दयनीय नव्हती, असेदेखील पत्रात नमूद करण्यात आले आहे. माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह या नेत्यांची स्वाक्षरी पत्रावर आहे. उत्तर प्रदेशातील राजकारणात प्रियांका गांधी सक्रीय झाल्या आहेत. मात्र स्थानिक नेत्यांशी त्यांचे जमत नसल्याचीही चर्चा आहे. प्रियांका गांधी यांनाच या नेत्यांनी लक्ष केल्याचे पत्रातून दिसून येते.

राज्यातील पक्षाच्या प्रभारींकडून तुम्हाला सद्यस्थितीची माहिती दिली जात नाही, अशी शंका वाटते. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जवळपास वर्षभरापासून वेळ मागत आहोत. मात्र आम्हाला वारंनवार भेट नाकारली गेली. आम्ही आमच्यावरील निलंबनाच्या कारवाईविरोधात अपील केलं होतं. आमच्यावरील कारवाई अवैध होती. मात्र आमच्या अपीलवर विचार करण्यासही केंद्रीय समितीला वेळ मिळाला नाही, असं नऊ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

Copy