गांधीजी होण्यासाठी पत्नीलादेखील सोबत ठेवावे लागते

0

नवी दिल्ली :‘फक्त चरख्यासोबत छायाचित्र काढल्याने कोणी महात्मा गांधी होत नाही. त्यासाठी कस्तुरबादेखील सोबत असाव्या लागतात,’ या विधानाचा वापर करत केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिकेवर गांधींचे छायाचित्र हटवण्यावर भाष्य करतानाच केजरीवाल यांनी पत्नीपासून दूर राहणार्‍या मोदींवर टीका केली आहे. आधी मोदींच्या आईवरूनदेखील केजरीवाल यांनी जोरदार टीका केली होती हे विशेष.

पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन मेहसाणा जिल्ह्यातील उंझामध्ये त्यांचा भाऊ अशोक मोदी यांच्यासोबत राहतात. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर जशोदाबेन यांना मेहसाणा पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली. पंतप्रधान मोदी दिल्लीतील पंतप्रधान निवासात एकटेच राहतात. पंतप्रधान मोदींची आई मोदींचे लहान भाऊ पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राहते. पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा गुजरातला जातात, तेव्हा तेव्हा आईची भेट घेतात. मात्र ते पत्नीला कधीही भेटत नसून यावरूनच केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

केजरीवालांवर उपचार
दरम्यान, सततचे दौरे आणि प्रचारामुळं आलेला तणाव व खाण्या-पिण्यातील अनियमिततेमुळं केजरीवाल यांच्या शर्करेचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपचार करण्यासाठी 7 फेब्रुवारीपासून ते बेंगळुरू इथं जाणार असून जिंदाल निसर्गोपचार केंद्रात 10 ते 12 दिवस उपचार घेणार आहेत. केजरीवाल यांची पत्नी सुनीता व ’आप’चे नेते संजय सिंह हेही त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.