गांधींपेक्षा मोदीच मोठा ब्रँड!

0

अंबाला । राष्ट्रपिता महात्मा गांधीजींपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा मोठा ब्रँड आहे. आगामी काळात हळूहळू चलनातील नोटांवरून गांधीजींचे छायाचित्रही काढले जाईल, असे वक्तव्य करून हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरील गांधीजींचे छायाचित्र हटवून त्याजागी मोदींचे छायाचित्र वापरण्यात आल्यावरून सध्याच वाद सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विज यांनी हे वक्तव्य केल्याने पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. भाजपने विज यांच्या वक्तव्याची तातडीने गांभीर्याने दखल घेत या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, पक्षाची ही अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत विज यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे माझे महात्मा गांधीजी यांच्याबद्दलचे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी हे वक्तव्य मागे घेतो, असे विज यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर तीव्र संताप
दरम्यान ही जाहिरात समोर आल्यापासून सोशल मीडियावर सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. सोबतच महात्मा गांधी यांच्याशी तुलना केल्यामुळे मोदी यांची व्यंगचित्रे देखील सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

म्हणे मोदी हेच योग्य ब्रँड अँबेसेडर
महात्मा गांधी यांचे नाव खादीशी जोडले गेल्याने खादीची दुर्दशा झाली आहे. खादीसाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी हेच योग्य ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. जेव्हापासून गांधीजींचे नाव खादीशी जोडले गेले आहे तेव्हापासून खादी व्यवसाय डबघाईला आला आहे, असा अजब तर्कही विज यांनी मांडला. तसेच गांधींजींचे नावच असे आहे की, ज्यादिवशी त्यांचे छायाचित्र नोटेवर छापले त्याचदिवशी चलनाचे अवमूल्यन झाले, असे तारेही त्यांनी तोडले. खादीसोबत गांधींजींचे नाव असायला हवे असे काही पेटंट नाही. त्यामुळे उगाच वाद निर्माण करू नये. मोदींचा चेहरा खादी आणि ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवर छापताच खादीची विक्री 14 टक्क्यांनी वाढल्याचा अजब दावाही विज यांनी केला.

नोटांबरून गांधीजी हटवाच
मुंबई । भ्रष्ट राजकारणी भ्रष्टाचारासाठी नोटांचा वापर करतात. त्यामुळे नोटांवरून गांधीजींचे छायाचित्र हटडवले, तर बरेच होईल, असा टोला महात्मा गाधीजींचे नातू तुषार गांदी यांनी शनिवारी लगावला. महात्माजी इंग्लंडच्या दौर्यावर खादी परिधान करूनच गेले होते. ब्रिटनच्या राणीला भेटण्यासाठी ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेले तेव्हाही त्यांनी खादी परिधान केली होती. दहा लाखांचे सुट घालून ते फिरत नव्हते, अशा शब्दांत तुषार गांधी यांनी विज व भाजपवर टीका केली.

हिटलर व मुसोलीनीही होते ब्रँड-राहूल
हरियाणा राज्य सरकारचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी खादी ग्रामोद्योग कॅलेंडरवरुन केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी टोला हाणत टीका केली आहे. खादीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींपेक्षा मोठा ब्रॅण्ड आहेत असं वक्तव्य अनिल वीज यांनी केलं होतं. यावर टीका करत राहुल गांधींनी हिटलर आणि मुसोलिनीदेखील ब्रॅण्ड होते असं म्हणत मोदींची हिटलरशी तुलना केली आहे. यामुळे या मुद्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोदी चालविताहेत गोडसेंची परंपरा
खादी ग्रामोद्योग ही केंद्राची एक महत्वपूर्ण संस्था आहे, तिला एक गौरवशाली इतिहास आहे, अशा संस्थेची परंपरा मोडत पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींऐवजी स्वत:चे छायाचित्र छापून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नथूराम गोडसेच्याच मार्गावर जात आहोत, हे सिद्ध केले आहे, अशी टीका कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता पी. एल. पुनिया यांनी केली आहे. ही संस्था म. गांधीच्या विचारातूनच साकारली होती, याची दखल मोदींनी घेतलीच पाहिजे होती असे ते म्हणाले.