गरीबांच्या जीवाला किंमत नाही का?

0

डॉ.युवराज परदेशी:

वेगाने पसरणार्‍या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 51 लाखांच्यावर पोहचली आहे. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत 83 हजार 198 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही सर्व आकडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्य आणि केंद्र शासन मोठ मोठे दावे करत आम्ही कोरोनाला कसं रोखून धरले आहे, यावरुन स्वत:चीच पाठ थोपटवून घेत असले तरी महानगरे वगळता शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील वस्तूस्थिती अत्यंत भयावह आहे. रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने किंवा आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना दररोज वृत्तपत्रे, टिव्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकण्यात किंवा वाचण्यात येत आहेत. यास जबाबदार कोण?

कोरोना महामारीने संपूर्ण जग हैराण झाले आहे. कोरोना विषाणूने जगाचे चित्र बदलून टाकले असून, भारतासह अनेक देश या महामारीचा सामना करत आहेत. कोरोनाच्या संसगार्मुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. सध्या इतर देशांच्या तुलनेत भारतात दिवसाला आढळून येणार्‍या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून येण्याचा विक्रमही दुर्दैवाने भारताच्या नावे नोंदवला गेला आहे. जगभरात सापडणार्‍या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल 40 टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात सरासरी 80 ते 90 हजार करोनाबाधित आढळत असल्याने देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता 51 लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. वर्ल्डोमीटर संकेतस्थळावरील माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत सध्या अमेरिका पहिल्या क्रमाकांवर आहे. तर भारत दुसर्‍या स्थानी आहे. यात सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून येत आहेत. सुरुवातीच्या दोन टप्प्यांमध्ये केवळ शहरी भागापुरता मर्यादित असणार्‍या कोरोनाने आता ग्रामीणभागात आपला विळखा घट्ट केला आहे.

सरकारी यंत्रणा अपयशी आणि सर्वसामान्य हतबल अशी अवस्था राज्यभरात अनुभवायला मिळते आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीचा नंबर लागतो. गेल्या काही दिवसांत दररोज किमान 80 ते 90 हजार रुग्णांची भर पडत होती. असे असले तरी भारताचा रिकव्हरी रेट सर्वांत जास्त म्हणजे 78.28 टक्के असल्याचा सरकारचा दावा आहे. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात का आहेत? यावर राज्य सरकार म्हणते, महाराष्ट्र हे वेगाने शहरीकरण झालेले राज्य आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढल्याचे दिसते. राज्यातील 52 टक्के रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन शहरांमध्ये आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय संपर्क येतो. त्यामुळे त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. विकसित राज्य असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत मजूर येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. याचा अर्थ आमची काही जबाबदारी नाही, असे सरकारला म्हणायचे आहे का? ‘भारतातील दररोजची कोरोना रुग्णवाढ ही जगात सर्वात जास्त आहे. याचे नियोजन सरकारला नीट करता आलेल नाही.

अनियोजित लॉकडाउनमुळे देशभरात कोरोना पसरला अशा परिस्थीतीत देशातील लोकांना त्यांच्या भरवशावर सोडून मोदीजी मोरांबरोबर खेळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी स्वभावामुळेच भारतात कोरोनाचा उद्रेक होत’ असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. एका बाजूने हे खरे आहे असे मानले तर मग रुग्णांची संख्या देशात सर्वकडेच वाढायला हवी होती मात्र ती केवळ काही ठराविक राज्यांमध्येच का वाढत आहे, यासाठी संबंधित राज्य सरकार देखील तितकेच जबाबदार आहे, जितके नरेंद्र मोदी! देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, राज्यातील सरकारमध्ये काँग्रेसदेखील सहभागी आहेत, मग त्यांची काहीच जबाबदारी नाही का? असा प्रश्न कुणी उपस्थित केला तर लगेच मोदी विरोधक आणि मोदी भक्त असा वाद सुरु होतो. मात्र मुळ प्रश्न तसाच राहतो. महाराष्ट्र सरकार गेल्या आठवड्यापर्यंत कोरोनाशी लढायचे सोडून कंगणाशी लढत होते. यावर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेनेचे कान टोचावे लागले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे काही रुग्णालये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देत आहेत.

रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे या रुग्णालयांचे म्हणणे आहे, तर खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेडस्ही सरकारने कोविड रुग्णांसाठी ताब्यात घेतले असूनही रुग्णांना योग्य उपचार मिळेनासे झाले आहेत. बहूतांश रुग्णांकडून मोठ्या रकमेची बिले आकारणे, वेळेत उपचार न देणे, निधनानंतर भलत्याच व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देणे अशा न संपणार्‍या संकटाची मालिका राज्यभरात दिसते आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजावाजा आणि कोट्यवधींचा निधी खर्ची टाकत जम्बो कोविड सेंटर घाईघाईने सुरु केली. मात्र तेथेही प्रचंड अनागोंदी दिसत आहे. काही कोविड सेंटर्समध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनाही घडल्या, याला दोषी कोण? कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला नागरिकांची बेफिकरी कारणीभुत आहेे, असे म्हणत राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कारण या अनागोंदीत सर्वाधिक हाल गरीब व मध्यमवर्गीयांचे होत आहेत. रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही, जागा मिळाली तर ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन असले तर तज्ञ डॉक्टर्स व आवश्यक इन्जेक्शन आणि औषधी मिळत नाही, ही विदारक वस्तूस्थिती सरकार नाकारु शकणार नाही.