गतिरोधकावर दुचाकी येताच पाठीमागून आदळला ट्रक : बोदवडचा दुचाकीस्वार ठार

Bike rider of Bodwad killed in collision with mini truck in Bhusawal भुसावळ : बोदवड येथून भुसावळातील आठवडे बाजारात मिरची विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याचा शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील गणेश ट्रेडर्ससमोरील सर्व्हिस रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला. योगेश प्रकाश माळी (40, माळीवाडा, बोदवड) असे मयताचे नाव आहे. माळी हे दुचाकीने बोदवडकडे निघाले असताना ब्रेकरवर त्यांनी वाहनाचा वेग कमी केला मात्र त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मिनिट्रकने दुचाकीला 40 फूट फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता मात्र अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

अपघाताने बोदवड शहरात शोककळा
रविवारी भुसावळचा आठवडे बाजार असल्याने मिरची विक्रीसाठी योगेश माळी हे सकाळी शहरात दुचाकीने आले होते. दिवसभरात मिरची विक्री केल्यानंतर ते दुपारी तीन वाजेच्या सुमारास बोदवडकडे दुचाकीने निघाले मात्र महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील गणेश ट्रेडर्ससमोर त्यांची दुचाकी ब्रेकरवर येताच पाठीमागून आलेल्या भरधाव 609 वाहना (मिनी ट्रक) (एम.एच.16 क्यू.2047) ने दुचाकीला जोरदार धडक दिली तर या धडकेने दुचाकीस्वार वाहनासह सुमारे 40 फुटापर्यंत फरफटत ओढला गेला.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
माळी यांच्या डोक्याला प्रचंड मार बसल्याने ते बेशुद्ध झाल्याने त्यांना आधी ट्रामा सेंटरला व नंतर डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत आयशर चालक संतोष शामराव बर्‍हाटे (वरणगाव, ता.भुसावळ) यास ताब्यात घेतले तर अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.