गण गण गणात बोते चा श्री भक्तांनी केला जयघोष

0

भुसावळ । संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भक्तांनी ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष केला. भक्तगणांतर्फे धार्मिक कार्यक्रम तसेच सायंकाळी पालखी काढण्यात आली. यावल रोडलगत असलेल्या गजानन महाराज मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक, षोडोपचार पुजा करण्यात आली. सकाळी 8.30 वाजता, दुपारी 11.30, संध्याकाळी 6.30 अशी तीन वेळेस आरती करण्यात आली. तर दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना पिठले पोळीचा प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिरातर्फे संत गजानन महाराजांचा प्रकटदिन, चैत्र शुध्द नवमीला राम नवमी, आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा, ऋषी पंचमी भाद्रपद शुध्द पंचमीला महाराजांचा समाधी दिन, 22 एप्रिल रोजी मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम साजरे केले जातात.

तुकाराम नगरात होमहवनासह श्रीमद्भगवतगीता पारायण
तुकाराम नगरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान होमहवन करण्यात आले. दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान श्रीमद्भगवतगीता पारायण वाचन करण्यात आले. यानंतर 3 ते 6 वाजेदरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. रात्री हभप जिवन महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी त्यांनी भक्तीचा महिना सांगितला. दिवसभरातील संपुर्ण कार्यक्रमात परिसरातील भाविकांची उपस्थिती लाभली. किर्तनास न्हावी, देना नगर, गोविंद कॉलनी, वेडीमाता मंदिर परिसर, दत्त नगर, कोंडीवाडी, श्रीराम नगर, हनुमान नगर परिसरातील भजनी मंडळाचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी हभप दिपक महाराज शेळगावकर व तुकाराम नगर मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

पालखी मिरवणूक
जामनेर रस्त्यावरील संत गजानन महाराज देवस्थानतर्फे प्रकटदिन साजरा करण्यात आला. पहाटे 5.30 ते 7.30 वाजेच्या सुमारास पुजा, अभिषेक, पंचोंपचार पुजा, सकाळी 6 वाजता सामुहिक पारायण करण्यात आले. तसेच दिवसरात सकाळ, दुपार व संध्याकाळची आरती करण्यात आली. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. सायंंकाळी 4 वाजेपासून अष्टभुजा देवी मंदिरापासून पालखी काढण्यात आली. हि पालखी पांडूरंग टॉकीज, विठ्ठल मंदिर वॉर्ड, गांधी चौक, मरिमाता मंदिर येथून जामनेर रोड परिसरातील गजानन महाराज देवस्थानावर सांगता करण्यात आली.

स्वामी विवेकानंद मंडळ
दामु कुंभार वाड्यातील स्वामी विवेकानंद मंडळातर्फे संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सामुहिक पारायण पठण, संगीतमय श्री गजानन विजय पोथीसार विवेचन व पालखी मिरवणूक सोहळा घेण्यात आला. दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात येऊन सायंकाळी दामु कुंभार वाड्यापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यशस्वीतेसाठी नगरसेवक अ‍ॅड. तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन देशमाने, रितेश सैतवाल, अश्‍विन सरोदे, स्वराज्य गृप, होय हिंदूच गृप, ओंकारेश्‍वर मंडळ, माऊली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

खिर्डी येथील गणपती मंदिरात पूजन
खिर्डी येथील गणपती मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम गजानन महाराजांच्या मूर्तिचे पूजन महाअभिषेक व महाआरती किरण नेमाडे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी मंत्रोपचार अभिजीत कुलकर्णी यांनी केले तर यावेळी गणपती मंदीर समितीचे अध्यक्ष मनोज जैस्वाल, उपाध्यक्ष किरण नेमाडे, सचिव समाधान महाजन, गोपाल पाटील, राजू पाटील, प्रमोद वराळे सुभाष बोरणारे, योगेश महाजन, फकीरा तावडे, फकीरा कोळी, बाळु कोळी राहुल महाजन, पंकज महाजन यांच्या उपस्थित भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.