गणेश स्कूलच्या विद्यार्थ्यांची स्वच्छतेविषयी जनजागृती

0

विविध उपक्रमांनी स्वच्छता अभियानाचा समारोप

नवी सांगवी : दापोडी येथील एसएसपी शिक्षण संस्थेच्या गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाचा नुकताच विविध उपक्रमांनी समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेविषयी जनजागृती केली. गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियान सप्ताहास सुरुवात केली होती. नुकतीच प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांनी या अभियानाची सांगता केली. सप्ताहा दरम्यान शाळेत स्वच्छता विषयक संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन चित्रकला स्पर्धा, फ्लेक्स, बॅनर्स सजावट स्पर्धा घेण्यात आली.

त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळा व शालेय परिसरातील श्री गणेश मंदिर, विनियार्ड चर्च, बौद्ध विहार आदी धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून दापोडी परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता केली. तसेच पथनाट्य सादर करून जनजागृती केली. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक एस.बी.पाटील, प्राचार्य डी.एन.घारे, शैक्षणिक सल्लागार सुनिल शेवाळे आदींसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थापक एस.बी.पाटील तसेच प्राचार्य घारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Copy