गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणात चार जिल्ह्यांनी ओलांडली शंभरी

0

नाशिकच्या पंचवटीमध्ये सर्वाधिक नोंद; पुणे शहरात मर्यादेपेक्षा दुप्पटीने प्रदूषण

पुणे : सांस्कृतिक वारसा असलेला गणेशोत्सव सर्वत्र अतिशय धूमधड्याक्यात साजरा केला जातो. मात्र या गणेशोत्सवामध्ये होणारे ध्वनीप्रदूषण हा पर्यावरण आणि आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणार्‍या ध्वनी प्रदूषणाने यंदा शंभरी ओलांडली आहे. राज्यात सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद नाशिक येथील पंचवटी येथे झाली आहे. याठिकाणी सर्वाधिक म्हणजेच 105.0 इतकी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झालेल्या पुणे शहरात यंदा तुलनेने कमी ध्वनी प्रदूषण झाले असले, तरी ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेपेक्षा हे प्रमाण दुप्पटीने जास्त असल्याची नोंद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात करण्यात आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोंद

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा आणि डीजे यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तासन्तास चालणार्‍या या मिरवणुकीदरम्यान होणार्‍या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचत असल्याचे विविध स्वयंसेवी संस्थांनी सांगितले आहे. याची नोंद घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या काळात ध्वनीप्रदूषणाची विशेष नोंद घेतली जाते. यंदाही मंडळातर्फे राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी प्रदूषणाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, नांदेड, नागपूर, कोल्हापूर आणि सांगली यांचा समावेश आहे.

कोथरूड भागात प्रमाण 101.5

यंदा सर्वाधिक नोंद झालेल्या नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर 2017 साली पंचवटी येथे 95.7 इतकी नोंद झाली होती. तर, पुण्यात सर्वाधिक नोंद झालेल्या कोथरूड भागात हे प्रमाण 101.5 इतकी होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यंदा सर्वाधिक नोंदीचे प्रमाण चार डेसीबलने वाढले आहे. अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षप्रसाद गंधे यांनी दिली.

मुंबई, ठाणे व चंद्रपूर यांचा समावेश

राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये 100 डेसीबलपेक्षा अधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई (103.8), ठाणे (104.7), नाशिक (105.0), चंद्रपूर (103.3) यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणाची नोंद 100 डेसीबलपेक्षा जास्त झाली आहे.