Private Advt

गटबाजीच्या राजकारणापासून विभक्त राहून कामावर लक्ष केंद्रित करा

रा.काँ. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे आवाहन

शहादा। तळागाळात काम करणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे, नागरी सुविधेचे प्रश्न मार्गी लावणे, तालुक्याचा कार्य अहवाल जिल्हाध्यक्षांना सादर करणे, स्थानिक पोलीस स्थानकांमध्ये बैठका घेणे, भजनी मंडळाच्या बैठका घेणे, शिक्षक व डॉक्टरांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्याशी वारंवार चर्चा करणे अशा प्रकारे तालुका निरीक्षक कार्यरत राहतील. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गटबाजीच्या राजकारणापासून विभक्त राहून फक्त स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवनियुक्त महिला निरीक्षकांना केले. तसेच तालुका निरीक्षकांच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले. रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील आणि रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील महिला पदाधिकार्‍यांची आढावा बैठक नुकतीच प्रदेश कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. आशा मिरगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी सुरेखा ठाकरे, संजय खोडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत रुपाली चाकणकर यांच्या हस्ते अलका जोंधळे, संगिता पाडवी, हंसा अहिरे, प्रतिभा कुलकर्णी यांना निरीक्षक म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले.

पक्ष संघटना वाढविणे, पक्षाचे कार्यक्रम तळागाळात रुजविणे तसेच नागरी सुविधेची कामे सुरळीतपणे होण्याकरीता, कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष यांच्यातील संवादाचा दुवा बनण्याचे काम हे निरीक्षक करतील, अशी भावना रुपाली चाकणकर यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, संघटक शांतीलाल साळी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश पठाण, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, शहादा तालुका महिलाध्यक्षा रेशमा पवार यांची उपस्थिती होती.

निरीक्षकांनी संघटना वाढविण्यासाठी हातभार लावावा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच 2024 साली होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात आपल्याला जर यश मिळवायचे असेल तर आतापासूनच जोमाने काम करावे लागेल. संघटनेच्या कामावर लक्ष ठेवणे, त्याचे निरीक्षण करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी निरीक्षकांवर आहे. तसेच रेशनिंग दुकानाच्या समस्या सोडविणे, पोलीस स्थानकांमधील बैठका, बुथ बैठकांचा सविस्तर आढावा, भजनी मंडळ आढावा, शिक्षक आणि डॉक्टरांच्या गटांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणे, असे विविध कार्यक्रम हाती घेऊन निरीक्षकांनी संघटना वाढविण्यास हातभार लावावा, असे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी सांगितले.

स्त्रियांना संघटनेशी जोडून शक्ती वाढवा
पक्ष संघटना मजबूत व्हावी याकरीता पुरूषांपेक्षाही स्त्रिया अधिक जोमाने काम करतात. तसेच पुरूषांपेक्षा स्त्रियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के जागा महिलांना लढायच्या आहेत. महिलांची साथ जर मिळाली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला टिकाव लागणार नाही. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला न जुमानता आपली शक्ती विभक्त होणार नाही याची काळजी घ्यावी. समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या स्त्रियांना संघटनेशी जोडून आपली शक्ती वाढवावी, असेही ते म्हणाले.