खोरोची ते रेडणी रस्त्याची दुरवस्था

0

खड्डे, काटेरी झुडपांमुळे रस्ता बनला धोकादायक

इंदापूर : खड्डे आणि काटेरी झुडपांमुळे इंदापूर तालुक्यातील खोरोची ते रेडणी रस्त्याची खड्डे आणि काटेरी झुडपांनी दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांसाठी हा रस्ता जीवघेणा बनल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. खोरोची हे गाव नीरा नदी किनारी वसलेले असून, ते सुमारे तीन हजार लोकसंख्येचे आहे. नीरा नदी किनारी असल्याने पाटबंधारे खात्याकडून शेतीला या परिसरातील कॅनॉलच्या माध्यमातून पाणी मिळत आहे. त्यामुळे या परिसरात शेती फळबागा आणि शेती संलग्न व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. या परिसरातली नागरिक या निरवांगी ते सराटी आणि खोरोची ते रेडणी या रस्त्याचा वापर करून शासकीय अथवा शेती संलग्न आवश्यक कामे करण्यासाठी मोठ्या शहराकडे जातात. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

रस्त्याचे काम निकृष्ट

चार-पाच वर्षांपूर्वी सराटी ते खुर्ची रस्त्याचे काम झाले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळामध्ये निरवांगीपासून काही अंतर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम दर्जेदार झाले आहे. खोरोची ते रेडणी केवळ पाच किलोमीटरचे अंतर काटेरी झुडपे आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यांमुळे धोकादायक बनले आहे. खोरोची आणि रेडणी भागातील विद्यार्थ्यांना तर कसरत करतच शाळा-महाविद्यालयांत जावे लागत असल्याची खंत या भागातील माजी सरपंच संजय चव्हाण, उपसरपंच सतीश हेगडकर, हनुमंत देवकर, सुनील कोकरे, दादासाहेब वाघमोडे, विशाल देवकर, दत्तात्रय फडतरे यांनी व्यक्त केली.

Copy