खोटेनगरात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव:घरात वडील झोपलेले असतांना मागच्या खोलीत नववीचा विद्यार्थी हर्षल विनोद पाटील (सुर्यवंशी) वय 13 रा. मानवसेवा शाळेजवळ खोटेनगर याने साडीच्या सहाय्याने गळफास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नेमके आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरातील दोन खोल्यांपैकी एका खोलीत मंगळवारी हर्षलचे वडील विनोद हिलाल सुर्यवंशी झोपले होते. तर हर्षलची आई साधना हे घराबाहेर गेलेल्या होत्या. यादरम्यान घराच्या मागच्या खोलीत हर्षलने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. बाहेर गेलेल्या साधना घरी आल्यानंतर त्यांना हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला व त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कदीर तडवी, पोलीस हवालदार साहेबराव पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अनिल तायडे यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी हर्षलचे वडील विनोद सुर्यवंशी यांचा आक्रोश बघून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल तायडे हे करीत आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील विनोद सुर्यवंशी हे तीन ते चार वर्षापूर्वी जळगावातील खोटेनगरात स्थायीक झाले आहेत. ते फायनान्समध्ये नोकरीला होते. मात्र लॉकडाऊनमुळे घरीच असून मिळेल ते काम करुन ते उदरनिर्वाह भागवित आहेत. हर्षल व विनय अशी दोन मुले त्यापैकी हर्षल हा मोठा होता. तो घराजवळ असलेल्या मानवसेवा शाळेत शिक्षण घेत होतो. आठवी पास होवून तो नववीत गेला होता. कुठलेही कारण नसतांना हर्षलचे टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्‍न कुटुंबियांसह अनेकांना पडला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर हर्षलचा मृतदेह मूळ गावी मोराणे येथे हलविण्यात आला.

Copy