खेळाडूंना सहा महिन्यांपासून पगारच नाही!

0

मुंबई। बीसीसीआयमधील अंतर्गत वादांमुळे ’बुरे दिन’ आले आहेत. मात्र या वादांचा फटका खेळाडूंना सोसावा लागत आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयमध्ये प्रशासकीय समिती नेमली असली तरी बीसीसीआय आणि कोर्टातील लढाईत खेळाडूंचे हाल झाले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंचे गेल्या सहा महिन्यांचे मानधन थकवले आहे. मागच्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना त्यांची मॅच फी आणि 1 कोटी रुपयांची बोनसची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

पदाधिकारी-प्रशासकांच्या समितीमध्ये वाद
कसोटी मालिकेनंतर 15 दिवस किंवा महिन्याभरात आत आम्हाला मानधन मिळते. यावेळी नेमका का विलंब होतोय ते आम्हाला माहित नाही पण यापूर्वी असे झाले नव्हते असे भारतीय संघातील एका खेळाडूने सांगितले. बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रशासकांच्या समितीमध्ये सुरु असलेला वाद तसेच महसूलावरुन आयसीसी बरोबर मतभेद असल्याने खेळाडूंना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. 2016-17 च्या मोसमात भारतीय संघ न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एकूण 13 कसोटी सामने खेळला. मायदेशात झालेल्या या मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला होता. कसोटी संघात खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला बीसीसीआय 15 लाख तर, राखीव खेळाडूंना 7 लाख रुपयांचे मानधन देते. यापूर्वी मालिका संपल्यानंतर दोन महिन्यांच्या आत खेळाडूंच्या हाती चेक पडायचा. पण यावेळी सहा महिने झाल्यानंतरही खेळाडूंना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत.