Private Advt

खेडी खुर्द येथील तरुणाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

जळगाव : तालुक्यातील खेडी खुर्द येथील 37 वर्षीय तरुणाचा घरातच पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापतीने मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक प्रभाकर पाटील (37, खेडी खुर्द, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात नोंद
जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील दीपक हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता मात्र आजारी असल्याने तो घरीच होता. त्याची पत्नी मुलासह माहेरी गेली असल्याने दीपकने सोमवारी रात्री खालच्या मजल्यावर राहत असलेल्या आपल्या आई-वडीलांकडे जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. मंगळवार, 22 मार्च रोजी सकाळी 10 वाजले तरी दीपक उठला नसल्याने त्याचे वडील दीपक झोपलेल्या ठिकाणी गेले. याठिकाणी दरवाजा आतून बंद असल्याने त्याच्या वडीलांनी खिडकीतून बघितले असता दीपक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर आपल्या कुटुंबियांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. पाय घसरून पडल्याने दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.