खून करून टाकलेल्या तरुणाची ओळख पटली

0
भोसरी : धारदार शस्त्राने तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. घटनेनंतर दोन ते तीन दिवसांनी त्याचा मृतदेह भोसरी येथील वाळके मळ्याजवळ आढळून आला. हा प्रकार रविवारी (दि. 23) पहाटे उघडकीस आला. यातील खून झालेल्या तरुणाची ओळख पटली असून यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. लवकुशकुमार रामचंद्र पांडे (वय 24, रा. सिद्धेश्‍वर शाळेजवळ, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी राजकुमार अनिल गवारे (वय 21, रा. जुनी सांगवी) व  गोपाळ मुरारी गायकवाड (वय 21, रा. पाडाळे वस्ती) या दोघांना अटक केली आहे.
रविवारी पहाटे वाळके मळ्याशेजारी असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीखाली अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. तरुणाच्या मानेवर, बरगडीवर, हातावर आणि डोक्यात धारदार शस्त्राने वार केले होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी खून झाल्याने कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. सुरुवातील खून झालेल्या तरुणाची कोणतीच ओळख पटली नव्हती. गणेश विसर्जनादिवशी हा मृतदेह सापडल्याने भोसरी परिसरात खळबळ उडाली. भोसरी पोलिसांनी कसून तपास करत खून झालेल्या तरुणाची ओळख पटवली. त्यानंतर लगेच रविवारी सायंकाळी दोन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार (दि. 28) पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण समजले नसून भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.
Copy