खुश खबर: राज्यात मान्सून डेरेदाखल !

0

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून काही काळ लांबला होता. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात आज मान्सून दाखल झाला आहे. आज गुरुवारी मान्सूनने हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मान्सूनने हर्नाई, सोलापूर, रामगुंडम आणि जगदलपूर असा प्रवास सुरु केला असून पुढील 48 तासांत राज्यातील मोठा भाग व्यापणार आहे. या काळात मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मान्सून येत्या २४ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली होती. बुधवारी मराठवाड्यात लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी या मान्सूनपूर्व सरी आहेत.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. २४ तासांत दक्षिण कोकण गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून, त्यापुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे १२ ते १३ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी बरसणाऱ्या मान्सूनपूर्व सरींमुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान घटले आहे. गेल्या २४ तासांत चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४१.५ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली.

सध्याची स्थिती विचारात घेता राज्यात १२ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल.
त्यामुळे सर्वत्र दमदार पाऊस होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सूनची वृष्टी सुरू होईल.

Copy