Private Advt

खुशखबर ! शहरातील मुख्य रस्ते लवकरच होणार खड्डे मुक्त

जळगाव प्रतिनिधी – शहर महानगर पालिकेला मिळालेल्या 42 कोटीच्या कामांच्या निविदेवर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरीकेली असून कामांना ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ते लवकरच खड्डे मुक्त होणार आहेत.

डिसेंबर महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेमध्ये 42 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये जळगाव शहरातील प्रमुख रस्ते डांबरीकरण करण्याचे प्रस्ताव महासभेने बहुमताने पारित केले होते. मात्र या प्रस्तावाला राज्य शासनातर्फे या प्रस्तावांना ग्रीन सिग्नल दिला गेला नव्हता. मात्र ,सोमवारी या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. अशी माहिती नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिली आहे.

2019 साली राज्य शासनाच्या 42 कोटींच्या प्रस्तावामध्ये अनावश्यक कामे घेण्यात आली होती. म्हणून प्रस्तावाला स्थगिती दिली होती. व केवळ आवश्यक अशी कामे घेऊन हा प्रस्ताव पुन्हा सादर करावा असे आदेश दिले होते. यासाठी त्री समिती गठीत करण्यात आली होती. ज्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आयुक्त सतीश कुलकर्णी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा समावेश होता. यांनी पुढाकार घेत 42 कोटी च्या प्रस्तावामध्ये केवळ आवश्यक कामांचा समावेश केला. ज्यामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. हा प्रस्ताव महासभेसमोर मंजूर करण्यात आला व महाराष्ट्र राज्य शासनाचा बांधकाम विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला. अखेर या प्रस्तावावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी 42 कोटीच्या प्रस्तावावर सही केल्यामुळे आता 58 कोटीच्या निधीला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव मनपातील सर्व नगरसेवकांना यासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये आपल्या प्रभागात विकासासाठी मिळणार असून येत्या आठवड्यात महासभा घेण्यात येईल असे म्हटले जात आहे. महासभेत अंदाजे 160 हून अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असून सर्वच प्रस्थाव हे रस्ते संधार्बत असणार आहेत, यामुळे शिंदे यांनी केलेल्या या सही मुळे जळगाव शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मनपाला मिळाले बर्थडे गिफ्ट

जळगाव महानगरपालिकेचा 21 मार्च जन्म दिवस आहे. 21 मार्च रोजीच सिद्धू कोल्हे या जळगाव मनपाच्या पहिल्या नगराध्यक्षा झाल्या होत्या. यामुळे जळगाव मनपाला 42 कोटी रुपयांचे बर्थडे गिफ्टच मिळाले आहे.

जळगाव शहरातील खड्ड्यांचा विषय हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय गंभीर बनला आहे. अशा वेळेस मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्वाक्षरी करणे ही जळगाव शहरासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे व विशेषतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार.
-नगरसेवक नितीन लढ्ढा

 

आजच्या दिवस हा जळगाव शहरासाठी आनंदाचा आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्वाक्षरी करणे ही जळगाव शहरासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार.

– महापौर जयश्री महाजन