Private Advt

खिर्डीसह परीसरातील शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून लाखोंची फसवणूक

37 शेतकर्‍यांनी दिले निभोंरा पोलिसात तक्रार अर्ज

खिर्डी (सादिक पिंजारी) : खिर्डी खुर्द येथील चार ते पाच व्यापार्‍यांनी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांकडील कपाशी, केळी, मका, ज्वारी, गहु खरेदी करून घेतला मात्र अनेक शेतकर्‍यांचे पैसे दिले नसल्याचे उघड झाले आहे. यात काही शेतकरी राहिलेले पैसे मागण्यासाठी गेले असता व्यापार्‍यांकडून मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार निंभोरा पोलिसात करण्यात आली आहे. एकूण 70 शेतकर्‍यांचे कोटींच्या आसपास व्यापार्‍यांकडे पैसे घेणे असून यापैकी 37 शेतकर्‍यांनी खिर्डी येथील तंटामुक्त समितीमार्फत निंभोरा पोलीस ठाण्यात पाच ते सहा व्यापार्‍यांविरोधात तक्रार अर्ज सादर केले आहेत.

फसवणुकीमुळे शेतकरी त्रस्त
या शेतकर्‍यांकडे दिलेल्या मालाच्या पावत्या व बँकेचे धनादेश आहेत. यापूर्वी देखील भुसावल येथील उद्योजक सानिया कादरी यांनी तालुक्यातील ऐनपूर, निंबोल येथील शेतकर्‍यांची केळी घेतली होती. त्याचा मोबदला शेतकर्‍यांना मिळाला नाही व धनादेश बँकेत वटत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना पुन्हा खिर्डी येथील काही व्यापार्‍यांनी अशाच पद्धतीची फसवणूक केली आहे. सद्यस्थितीत 37 शेतकर्‍यांनी अर्ज दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र 65 ते 70 शेतकरी आपले अर्ज सादर करणार असल्याचे समजते. याबाबत 37 शेतकर्‍यांनी सुरवातीला खिर्डी बुद्रुक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रजीत पाटील, सरपंच गफुर कोळी, माजी पोलीस पाटील अरुण पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती घन:शाम पाटील, किरण नेमाडे, जयंत पाटील, गंभीर पाटील यांच्याकडे फसवणुकीबाबत अर्ज सादर केले आहेत. शेतकरी व तंटामुक्त समितीने निंभोरा पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना अर्ज सादर केले आहेत.

व्यापार्‍यांची चौकशी करणार
खिर्डी येथील व्यापार्‍यांविरोधात शेतकर्‍यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत व्यापार्‍यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात येईल, असे सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे म्हणाले.