Private Advt

खिरोद्यात गावठी कट्ट्यासह दोघे जाळ्यात

नाशिकच्या आयजी पथकासह सावदा पोलिसांची संयुक्त कारवाई : आरोपींच्या ताब्यातून एक काडतूससह रीकामी पुंगळी जप्त

सावदा : गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्‍या दोन संशयीतांच्या नाशिक आयजींच्या विशेष पथकासह सावदा पोलिसांनी संयुक्त कारवाईत खिरोद्यातील बसस्थानकाजवळून मुसक्या आवळल्या आहेत. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गजानन भिकन शेजुळे (41, अंजनखोरे, जि.औरंगाबाद) व अनिल बद्री कछुवा (21, रा.कुर्‍हेपानाचे, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी एकाचवेळी पाच गावठी कट्ट्यांसह चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा गावठी कट्टा पकडण्यात आल्याने शस्त्र तस्करांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या विशेष पथकातील एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाणे तसेच सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, हवालदार मनोज हिरोळे, संजय चौधरी, ममता तडवी, यशवंत टहाकळे आदींच्या पथकाने केली.

दोघा आरोपींच्या आवळल्या मुसक्या
खिरोदा बसस्थानकाजवळील एका हॉटेलजवळ दोन संशयीत गावठी कट्ट्यासह येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला. संशयीत येताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या अंग झडतीत गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले तसेच एक रीकामी पुंगळी आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. सावदा पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.