खा. राजू शेट्टींचा राग नेमका कुणावर…!

1
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती स्वाभिमानाचे खा. राजू शेट्टी यांच्या कांदा रस्त्यावर पसरण्याच्या आणि डाळ फेकण्याच्या आंदोलनाने. विधानभवनाच्या गेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी सगळीकडे कांदा विस्कटत आंदोलन केलं. शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागण्यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. विधानभवनाच्या मेन गेटबाहेर घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कांदाफेको आणि तूरडाळ फेको आंदोलन केलं. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. शेतकऱ्यांचे वाली असलेले शेट्टी शेतमाल असा फेकून देत कवडीमोल समजून का बरं आंदोलन करताहेत? असं वाटत जरी असलं तरी हा त्यांचा स्टंट नवा नाही हे लक्षात घेऊन सत्ताधारी आणि विरोधक गपगुमान बघत राहिले. हे जरी सरकारचा निषेध करण्यासाठी असेल किंवा यातून काही प्रभावी होऊ शकत असं शेट्टी यांना वाटत असेल तर त्यांचे उजवे हात समजले जाणारे सदाभाऊ खोत हे सरकारचे प्रतिनिधी आहेत हे त्यांच्या लक्षात नाही काय? आंदोलनानंतर ‘आंदोलन माझ्याविरोधात नाही. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. तसंच हे आंदोलन आहे. आमच्यात संवाद आहे. कम्युनिकेशन गॅप नाही,” असं स्पष्टीकरण देत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घोंगड बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अत्यंत केविलवाणा वाटला.
शेतकऱ्यांबाबत सरकार खरोखरच निष्ठुर आहे हे अनेकदा सिद्ध झालं आहे. अर्थात केवळ हेच सरकार नव्हे. नागपूरच्या अधिवेशनात देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून तब्बल 12 वेळा पत्र येऊनही केंद्राच्या 50 आणि राज्याच्या 50 टक्क्यांच्या अनुदानाचा एक प्रस्ताव राज्यसरकारने पाठविला नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला होता. यात मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यातील वाद पुन्हा समोर आला होता. खुद्द गडकरींनी यासंदर्भात पत्र लिहून देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने धारेवर धरले होते. याचा अर्थ असा की ह्या मागण्या आजच्या नाहीत. केवळ दिखाऊपणा करून आंदोलन करण्यात काही अर्थ नाही. शेतकऱ्यांचे खरंच कल्याण स्वाभिमानी असलेल्या या नेत्यांना अपेक्षित असेल तर सरकारमध्ये संबंधित विभागाच्याच आपल्या सहकाऱ्याच्या भूमिकेविषयी देखील राजू शेट्टी यांनी विचार करायला हवा. अर्थात सत्तेत असल्याने सगळा गोलमाल ह्या नेत्यांना माहीत नसेल काय? मग अशा प्रकारे आंदोलन करून केवळ दिखाऊ सहानुभूती कितपत यशस्वी ठरेल हे येणारा काळ ठरवेल.
राजू शेट्टी यांच्या सोबत प्रत्येक आंदोलनात हाताला हात देत रस्त्यावर उतरणाऱ्या सदाभाऊंना त्यांचं हे मंत्रिपद स्वाभिमानाच्या शेतकरी आंदोलनाची देण असल्याचे विस्मरण का होतेय? हे देखील गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांशी इतकी सलगी असलेल्या आपल्या सहकाऱ्याच्या माध्यमातून देखील राजू शेट्टी आपली बाजू प्रभावीपणे ठेऊ शकले असते. मात्र स्वतः सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शेट्टी यांचा राग नेमका सरकारवर होता की सदाभाऊवर! हेच समजायला मार्ग नाही.