‘माही’साठी काहीही: धोनीसाठी स्पेशल सामना ठेवण्याचा बीसीसीआयचा विचार

0

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने केलेली घोषणा चाहत्यांना धक्कादायक होती. धोनीला अंतिम सामना खेळताना निवृत्त होतांना पाहण्याचे स्वप्न अधुरे राहिले. बीसीसीआयने धोनीसाठी एखादा सामना आयोजित करावा अशी मागणी चाहत्यांमधून होत आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटसाठी धोनीचं योगदान लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निरोपाचा सामना आयोजित करण्याच्या विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय मालिका नाही परंतु धोनीसाठी एखादा सामना आयोजित करता येईल का? याचा आम्ही विचार करत असल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याचे समोर आले आहे.

वन डे, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान मिळवले, ते धोनीच्या नेतृत्वाखालीच. 40 वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विक्रम नोंदवला. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. अशा या विक्रमादित्य धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करायलाच हवा, अशी मागणी जोर धरत आहे.

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

 

Copy