खासदार नवनीत राणांच्या कुटुंबियातील ७ जणांना कोरोनाची लागण

0

अमरावती: अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत कौर राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आमदार रवी राणा यांच्या आई, वडील, बहिण, पुतणे आणि भाची या सगळ्यांना करोनाची लागण झाली आहे. आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे. राणा कुटुंबातील बाधित व्यक्तींना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या ट्वीटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्या लहान मुलाच्या तपासणीसाठी नमुने घेताना तो रडत असल्याचे दिसून येते. “मी खासदार असले तरी एक आई देखील आहे. माझा मुलगा रणवीर हा स्वॅब घेताना रडत असल्याचे पाहून आई म्हणून मलाही खूप वेदना झाल्यात” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/NavneetKRana/status/1290233533051441152

आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणीही चिंता कारायची गरज नाही. संयमाने स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला करोनावर मात करायची असल्याचे ते म्हणाले. माझे आई- वडील आज ७०-७२ वर्षांचे आहेत. वृद्ध मंडळींची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. करोनाविरुद्धचा लढा आपण नक्कीच जिंकू असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान या सगळ्यांवर नागपूरमध्ये उपचार सुरु असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यासह सर्व सदस्य होम क्वारंटाइन झाले आहेत.