खासगी शिकवणी घेणार्‍यांवर कारवाई करा

0

चाळीसगाव । खाजगी शिकवण्या बंद करून गरीब विद्यार्थी पालक यांची पिळवणूक थांबावी यासाठी संभाजी सेनेने दिलेल्या निवदेनावर चाळीसगाव शिक्षण विभागाने चौकशी करून 2 शिकवणी चालक शिकवणी घेतांना आढळून आल्याने गट शिक्षण अधिकार्‍यांनी त्या महाविद्यालयांची अनुदान रद्द करून मान्यता रद्द करण्याची शिफारस नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांकडे केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली असून ही कारवाई अभिनंदनीय असली तरी चाळीसगाव शहरात इतरही शिक्षक बेकायदेशीर शिकवण्या घेतात. त्यांचेवर ही सरसकट कारवाई करावी, अशी मागणी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी केली आहे.

शिक्षण विभागाला निवेदने देऊनही उदासीनता
शहरात अनेक बेकायदेशीर शिकवण्या घेतल्या जातात. प्रामुख्याने अनुदानीत शाळा, महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक शिकवण्या घेऊन गरीब, कष्टकरी, शेतकरी, सर्व सामान्य विद्यार्थ्यांची व पालकांची लुट करतात. या विरोधात संभाजी सेना व इतर सामाजिक संस्थांनी वेळोवेळी शिक्षण विभागाला निवेदने देऊन आंदोलने देखील केली आहेत. त्यावेळी संबंधीत शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी शिक्षण विभागाला लेखी देऊन आमच्या शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक खाजगी शिकवण्या आढळून आल्यास त्याला आम्ही जबाबदार असू असे लेखी पत्र दिले असतांना देखील सदर शिक्षक, प्राध्यापक कुणालाही न जुमानता सर्रासपणे खाजगी शिकवण्या घेत असल्याचे शिक्षण विभागाला दिसून आल्याने व शिकवणी विरोधात संभाजी सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शिक्षण विभागाने संबंधीत शाळा, महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात येतील अशी तंबी देऊन देखील खाजगी शिकवण्या बंद झाल्या नाहीत.

याबाबत गट शिक्षण अधिकारी सचिन परदेशी यांनी कारवाईसाठी वेळोवेळी पाहणी केली असता, लक्ष्मीनगर मधील कोतकर महाविद्यालयातील 2 प्राध्यापक शिकवण्या घेतांना आढळून आल्याने गट शिक्षण अधिकार्‍यांनी कोतकर महाविद्यालयाचे अनुदान बंद करून मान्यता रद्द करण्याची शिफारस नाशिक उपसंचालकांकडे पाठविल्याने चाळीसगांव शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. गट शिक्षण अधिकार्‍यांची ही कारवाई अभिनंदनीय असून या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. चाळीसगांव शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर अवैध शिकवण्या सुरू आहेत. या शिकवण्यांविरोधात संभाजी सेनेने अनेक आंदोलने केली व करत राहणार आहे, असे संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले.

आंदोलन करण्याचा इशारा
गट शिक्षण अधिकार्‍यांनी शिकवणीच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा रितसर पंचनामा केला पाहीजे. कोणी शिक्षक महीलांना पुढे करत असेल, तर व्हिडीओ चित्रण करून त्या ठिकाणचा पंचनामा केला पाहीजे अशी मागणी केली आहे. गोरगरीब कष्टकरी, शेतकरी यांचेसह सर्व सामान्य घरातील विद्यार्थी व पालक यांचा लुट करण्याचा गोरख धंदा बंद न झाल्यास वेळ प्रसंगी संभाजी सेना येणार्‍या शैक्षणिक वर्षात शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक व शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्यास मागे हटणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.