खासगी शाळांचे ऑनलाईन वर्ग बंद

0

अहमदाबाद: गुजरातमधील अनेक खासगी शाळांनी गुरुवार, 23 जुलैपासून अनिश्चित काळासाठी ऑनलाईन वर्ग घेणे बंद केले आहे. राज्य शासनाने शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर शाळांनी वरील निर्णय घेतला आहे. सेल्फ-फायनान्स स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रवक्ते दीपक राजगुरू यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले की, राज्यातील बहुतांश सर्व स्ववित्त पोषित शाळा ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्यास नकार देत आहेत. ते म्हणाले की, ऑनलाइन शिक्षण हे वास्तव शिक्षण नाही, असे जर सरकारचे मत असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना असे शिक्षण देण्यास काही अर्थ नाही. जोपर्यंत सरकार हा आदेश मागे घेत नाही तोपर्यंत ऑनलाइन शिक्षण बंद ठेवले जाईल. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात युनियन उच्च न्यायालयातही धाव घेईल, अशा इशाराही राजगुरू यांनी दिली.

शिक्षण शुल्क न घेण्याचे, तसेच वाढ टाळण्याचे निर्देश
गुजरात सरकारने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या अधिसूचनेत कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर स्वयं-वित्तपुरवठा करणार्‍या शाळांना विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क न घेण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये शाळांना फी वाढविण्यासही मनाई करण्यात आली आहे. या निर्णयावर नाराज, गुजरातमधील स्वयं-वित्तपुरवठा करणार्‍या शाळांचे प्रतिनिधित्व करणार्‍या एका संघटनेने ऑनलाइन वर्ग थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Copy