खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवांना नकार नको

0

नवी दिल्ली – सर्व खासगी रुग्णालयातील डायलिसीस, रक्तपुरवठा आणि केमोथेरपी सारखे उपचार कोणालाही नाकारले जाऊ नयेत, ते सुरूच ठेवावेत असे आदेश केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. कोणतीही वैद्यकीय सेवा देण्यापूर्वी कोव्हिड-१९ची चाचणी करण्याचा आग्रह खासगी रुग्णालये आणि दवाखाने धरत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र या चाचण्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शनानुसारच व्हायला हव्यात, असे सुदान यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. करोना रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते, त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असायला हवी, पण त्याचबरोबर रुग्णांना त्यांच्या आवश्यक सेवाही देणे महत्त्वाचे आहे, याकडे सुदान यांनी लक्ष वेधले आहे. भीती दूर करून सर्व आरोग्य सेवा, विशेषत: खासगी रुग्णालये, दवाखाने सुरू राहतील आणि डायलिसीस, रक्तपुरवठा, केमोथेरपी व अन्य वैद्यकीय सेवा पुरविल्या जातील, त्या नाकारल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असेही या पत्रात म्हटले आहे. कोणत्याही स्थितीत इतर रुग्णांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचनाही केंद्राने केली आहे.

Copy