खासगी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई

0

नंदुरबार: जिल्ह्यातील आजारी नागरिकांच्या सोईसाठी सर्व मेडीकल दुकाने, सर्व रुग्णालये व क्लिनिक दैनंदिन वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाना बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या दवाखान्यात रुग्णांची होणारी गर्दी टाळावी. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे. रुग्णांची दूरध्वनीद्वारे नोंदणी करावी. एका वेळेस एकच रुग्णास तपासणीसाठी बोलवावे. तपासणीस येणार्‍या रुग्णाची तपासणी करताना शरीराचा कमीत कमी संपर्क येईल याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णाची तपासणी करताना ग्लोव्हज व मास्क वापरावे. रुग्णाशी कमीत कमी संपर्क येण्याच्यादृष्टीने रक्तदाब तपासणीस शक्यतो डिजीटल रक्तदाब तपासणी यंत्र वापरावे.
रुग्णांना रुग्णालयात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून येण्याबात सूचना द्याव्यात. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीनंतर हात स्वच्छ धुवून घ्यावे. कोरोना संशयित रुग्णास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोविड-19) उपाययोजना नियम 2020, भारतीय दंड संहितेमधील तरतूदीनुसार आणि भारतीय साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार दंडनीय तसे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.

Copy