खामखेडा प्रथा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

वनविभागाकडून तीन ट्रॅप कॅमेर्‍यासह दोन शोध पथके

शिरपूर। तालुक्यातील खामखेडा प्रथा शिवारात बिबट्या आढळून आल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिवाच्या भीतीने शेतकरी व शेतमजुरांनी शेताकडे जाणे बंद केले आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शिवार ओस पडले आहे. खामखेडा प्रथा शिवारातील ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे कळताच परिसरात भीती निर्माण झाली आहे. बिबट्याचा लवकर शोध घेण्यात येऊन पिंजरा लावून बिबट्याला वन विभागाने जेरबंद करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर असे, खामखेडा शिवारात सागर पाटील यांच्या ऊसाच्या शेतात 21 मे रोजी पहिल्यांदा बिबट्या आढळून आला होता. त्याबाबत सागर पाटील यांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनसंरक्षक आनंद मेश्राम, वनसंरक्षक संदीप मंडलिक, वनरक्षक वैशाली कुंवर, ज्ञानेश्वर शिरसाठ, नेचर कंझव्हेंशन फोरमचे प्राणी मित्र योगेश वारुडे यांनी भेट देत पाहणी केली. घटनास्थळी अनेक प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळून आले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी प्राण्यांचे पायांचे ठश्यांचे नमुने घेण्यात आले. नमुन्यात शिवारात एक मादी जातीचा बिबट्या व दोन पिलांचा शिवारात संचार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बिबट्याचा शोध घेण्याचे कार्य सुरूच
वन विभागाकडून खामखेडा प्रथा शिवारात तीन ट्रॅप कॅमेरे लावले आहे. 6-6 कर्मचार्‍यांचे दोन शोध पथके तैनात केली आहे. त्यात वन विभागाच्या वनरक्षक वैशाली कुवर, एकनाथ सूर्यवंशी, शंकर पावरा, पवन पावरा, राजू पाटील, रोहिदास पावरा, बाळू पवार आदी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. बिबट्याच्या सिद्धार्थ गावातील सागर पाटील, हिरामण कोळी, संजय पटेल आदी शेतकरी शिवारात शोध घेत आहेत. 26 मे रोजी सायंकाळपर्यंत ट्रॅप कॅमेरात बिबट्याची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. मात्र, पायांचे नवीन ठसे आढळून आले आहेत. तसेच बिबट्याचा शोध घेण्याचे कार्य सुरूच असल्याची माहिती वनरक्षक वैशाली कुवर यांनी दिली.