खान्देशातील तिघा लाचखोरांना न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

0

धुळे/नंदुरबार- खान्देशातील तीन लाचखोरांवर शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केल्यानंतर शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर आरोपींच्या घर झडतीत काहीही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माहिती अशी की, गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागात घाटबारी पाझर तलावाच्या बांधाखाली सिंचन विहिर खोदण्यासाठी साक्री तालुक्यातील खुडाणे गावाच्या 30 वर्षीय तक्रारदाराकडून 15 हजारांची लाच स्वीकारताना धुळे वनविभाग उप वनसंरक्षक विभागाचा सर्वेअर मनोहर बाबूलाल जाधव (36) यास अटक करण्यात आली होती. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश देसले, पोलिस निरीक्षक पवन देसले करीत आहेत. दुसर्‍या गुन्ह्यात असलोद गावात दलित वस्ती योजनेंतर्गत काँक्रिटीकरण कामाचा ग्रामपंचायतीकडून धनादेश काढून देण्यासाठी ग्रामसेवक महेश विनायक पाटील (42, असलोद, डोंगरगाव) 30 हजारांची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यासह पानटपरी चालक संदीप गोविंद मराठे (36, रा.नितीन नगर, प्लॉट नं. 14, शहादा) यास अटक करण्यात आली होती. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे करीत आहेत.

Copy