खान्देशातील आदिवासी टोकरे कोळी जमातीला जात प्रमाणपत्र देण्यासाठी फैजपूरात मोर्चा

0

शासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मोर्चेकर्‍यांनी लावल्या काळ्या फिती

फैजपूर- खान्देशातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमातींना जातीचा दाखला देणे व त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळविण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे मंगळवारी काळ्या फिती लावून फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

प्रांताधिकार्‍यांना दिले मोर्चेकर्‍यांनी निवेदन
हा मोर्चा फैजपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मालार्पण करून सुभाष चौकातून छत्री चौक मार्गे प्रांत कार्यालयावर काढण्यात आला होता. हा मोर्चा आदिवासी वाल्मिक लव्य सेवा संस्थापक शाना सोनवणे (शिंदखेडा) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, आत्महत्याग्रस्त कै.सुरेश एकनाथ कोळी, कै.जगदीश बळीराम कोळी, कै.महादू एकनाथ कोळी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपये शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत मिळावी, कै.वाल्मिक सुपडू सपकाळे यांच्या वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घेण्यात यावे, सन 1950 पूर्वीचा रहिवासी व जातीचा उल्लेख असल्याचा पुराव्याचा आग्रह प्रमाणपत्र देतांना धरू नये, त्यासाठी शासन परीपत्रकाचा आधार घ्यावा, अगोदर दिलेले जातीचे प्रमाणपत्र तत्काळ बदलून सी फार्म मध्ये देण्यात यावे, शासन परीपत्रकातील सूचनेनुसार कागदपत्राचे पुरावे न मागता जुने जमा करून नवीन सी फार्म मधील द्यावेत, नंदुरबार येथील जमातीचे प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय जळगांव वा धुळे येथे स्थलांतर करावे, जातीचे प्रमाणपत्र देण्याचे फेटाळण्याअगोदर बाजू मांडणे किंवा पुरावे सादर करण्यासाठी संधी देण्यात यावी, कल्पना न देता प्रकरणे परस्पर फेटाळू नये यासह 13 मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चाला भारिप बहुजन महासंघाचे यावल तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी त्यांच्या पक्षाचा पाठींबा दिला तर मोर्चात भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, आदिवासी वाल्मिक लव्य सेना जिल्हाध्यक्ष मोहन शंखपाळ, यावल तालुकध्यक्ष राजू सपकाळे, संदीप प्रभाकर सोनवणे, कोळी महासंघ रावेर तालुकाध्यक्ष राहुल कोळी, अजय कोळी (वढोदा), अनिल कोळी, नितीन कोळी, आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय विकास संस्था फैजपूरचे अध्यक्ष दिलीप कोळी, धनू कोळी, सुनील कोळी, उपाध्यक्ष अरुण कोळी, सचिव संतोष कोळी, सहसचिव मगन कोळी, मोहन कोळी, सागर कोळी, रुपेश कोळी यांच्यासह कोळी समाज बांधव व महिला सहभागी झाल्या.

Copy