खानदेश आमचा शांत-शांत का?

0

नागपूर (निलेश झालटे) – एक काळ होता ज्यावेळी खानदेशचे मुख्य लीडर नाथाभाऊ अर्थात माजी मंत्री आणि आ. एकनाथराव खडसे अख्खं सभागृह डोक्यावर घ्यायचे. नाथाभाऊ आरोपांमुळे बॅकफुटला आले आणि खानदेशचा आवाजच सभागृहात कुठ येईनासा झाला. आवाज हा विरोधातलाच असावा असा नियम नाही. मात्र सत्तेत असलेले भाजपाचे आणि शिवसेनेचे आमदार देखील अद्याप सभागृहात शांतच दिसून येत आहेत. मंत्री असलेले गिरीशभाऊ मात्र उत्तर देण्यात आणि दोन्ही सभागृहात सिरीयस चर्चेत हास्याचा रंग भरण्याचे काम सातत्त्याने करीत आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरील हास्याच्या छटा काही वेगळच गुपित सांगून जातात. इकडे नाथाभाऊ मात्र शांत चित्ताने सभागृहात चर्चा ऐकण्यात मग्न असतात.

महत्वाच्या चर्चेत ते भाग घेतात आणि भाग घेऊन आपल्याच सत्ताधार्‍यांना धारेवर देखील धरतात. नाथाभाऊ यांचे हे कसब त्यांनाच जमेल हे मात्र नक्की. आता खानदेशातील अनेक आमदार इथं हजेरी लाऊन आहेत. बुधवारी शिरीष पाटील, स्मिताताई वाघ, चंदूआण्णा आणि नवे शिलेदार चंदू पटेल यांनी भवनासमोर बसून निम्न पाडळसरे साठी स्टंटबाजी केली. मात्र मंत्री आपल्याच खात्याचे आणि आपलेच गाववाले निघाल्याने चर्चेने त्यावर पांघरून घातले गेले. अर्थात हे तर जळगावात बसून देखील झाले असते. मात्र इथं काय करायचं? हा प्रश्न ह्यांना पडला असावा त्यामुळे ही स्टंटबाजी असावी का? असावी सवाल मला मनोमन पडून राहिला आहे.

असो आपण बोलतोय शांततेवर. तर चंदू पटेल हे नवखे असल्याने त्यांच्याकडून कुठल्या चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा आपण इतक्या लवकर करू शकत नाहीत. मात्र स्मिताताई आता इथं बर्‍यापैकी रुळल्या आहेत. पण त्याही शांतच दिसून येतात. मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबभाऊंचे दर्शन अद्याप नागपुरात घडलेले नाही. बाकी युवा तरुणतुर्क उन्मेषदादांचा उन्मेष देखील थंडच दिसून येतोय. सतीश आण्णांनी काल शिरीष दादांवर अमळनेर नगरपालिका निवडणुकीत झालेल्या हल्लाप्रकरणी चर्चा व्हावी यासाठी आवाज उठवला, मात्र बाकी प्रश्नांवर ते ही अद्याप शांतच. चंदूअण्णांकडूनही चर्चेत सहभागी होण्याच्या अपेक्षा असतात, मात्र ते ही एका कोपर्‍यात बसून चर्चेचा आनंद घेण्यातच व्यस्त दिसून येत आहेत. राजूमामा अद्यापही सभागृहात नवखे असल्यागतच वाटत आहेत. त्यांचा महापालिकेतला फील अजून गेला नाही की काय? असाच प्रश्न डोक्यात निर्माण होतो आहे. सावकारे साहेब देखील या महत्वाच्या चर्चेपासून चार हात दूरच आहेत. सिनियर असलेले हरिभाऊ देखील शांतच. एकंदरीत नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ वगळता अद्याप एकाही सदस्याने सध्या विधानसभेत तापत असलेल्या नोटबंदी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या चर्चेत ब्र शब्दही काढलेला नाही. चर्चेत सहभागी कसं व्हावं? चर्चा कशी करावी? काय करावी? आणि का करावी? ह्या गोष्टीचं ट्रेनिंग नाथाभाऊ यांच्याकडून या सर्वांनी घेणे आवश्यक आहे. राहून राहून प्रश्न असा पडतो की, या बाकीच्यांना बोलायला स्पेस मिळत नाही का बोलायची इच्छाशक्तीच नाही?

बाकी परिषदेत झालेल्या चर्चेत नारायण राणे यांनी आपल्या मराठा असण्याचे आणि ते ही 96 कुळी मराठा असल्याचं जरा जास्तच कौतुक करून घेतलं. अर्थात एवढ्या मोठ्या नेत्याकडून जातीच्या अंतर्गत भेदाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मात्र मराठा आरक्षणाचे क्रेडीट घेण्याच्या नादात आपण काय बोलतोय याचं भानही नेत्यांना राहू नये हे दुर्दैव. अर्थात यासाठी धनंजय मुंडे यांचे कौतुक करावं तेवढ कमीच आहे. मराठा आरक्षणावर बोलताना अभ्यासपूर्ण मांडणी, त्यांची तळमळ निश्चित कौतुक करण्याजोगी आहे. अधिवेशनात आता नोटाबंदीच्या विषयाला जवळपास आराम मिळालाय. आता फक्त एकच विषय जोर लाऊन येणार आहे तो म्हणजे ’मराठा आरक्षण’. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी विरोधकांची तळमळ अधिक असली तरी सत्ताधारी अर्थात सरकारही त्याच्या विरोधात नाहीच. मराठा आरक्षणाचे मुद्दे मांडत असताना दोन्हीकडील नेते प्रकाश आंबेडकरांचे आभार मानताना दिसले ही देखील विशेष बाब. आता 14 तारखेला नागपुरात धडकणार्‍या मराठा क्रांती मोर्चाची सर्वत्र चर्चा सुरुय. यासाठी कालच मराठा आमदारांची बैठक झाली. सोशल मिडीयावर याबाबत गोसीप सुरु आहेच. 14 तारखेच्या आत काहीतरी सकारात्मक निर्णय अशी अपेक्षा आहे. मराठा आरक्षणासोबतच धनगर, लिंगायत व मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी देखील चर्चा जोरदार सुरु आहे.