खर्दे उंटावद मार्गे अवजड वाहनांची बिनधास्त होतेय एन्ट्री 

0

होळनांथे । शिरपूर येथून खर्दे-उंटावद मार्गे सावळदे या रस्त्यावर अवजड वाहनाचा सर्रास वापर सुरू असून गावकर्‍यांचे आंदोलन होऊनही अवजड वाहने सुरूच असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खर्दे-उंटावद मार्गे सावळदे या रस्त्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून माल वाहतूक ट्रक, कंटेनर व ट्रेलरसह अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांचा लेखी आदेशालाही खो देवून अवजड वाहनाचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहेत.

टोल वाचविण्यासाठी होतो वापर
जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असूनही खर्दे-उंटावद मार्गे होणार्‍या वाहतुकीचे मुख्य कारण शिरपूर फाटाजवळ असलेला टोलनाका असून टोल वाचविण्यासाठी सावळदेहून शिरपूर न येता खर्दे-उंटावद मार्गे शिरपूर येऊन टोल वाचविला जातो. खर्दे-उंटावद-सावळदे मार्गे अवजड वाहनांना बंदी असल्यासंदर्भ जिल्हाधिकार्‍यांचे लेखी आदेशाचे उल्लंघन म्हणजे न्यायालयाचा अवमान होत आहे. याबाबत खर्दे येथील ग्रामस्थांनी आंदोलनही केले असल्याचे कळते.

स्टोन वाहतुकीच्या सर्वाधिक गाड्या
खर्दे-उंटावद मार्गे बंदी असूनही स्टोन (खडी) व्यावसायिकांचे सर्वाधिक डंबर, ट्रकची वाहतूक होत असून बाभळे येथील खडी, शिरपूर- चोपडा तालुक्यासह मध्यप्रदेशातील वटला-बलवाडीपर्यंत जात असल्याने व क्षमतेपेक्षा अधिक ओव्हरलोउ माल असल्याने खडीच्या सर्वाधिक गाड्या ह्या खर्दे-उंटावद मार्गेेच जात असतात. खाजगी वाहनाबरोबरच एसटीचाही वापर संबंधीत रस्त्यावरूनच होत असून जिल्हाधिकारींच्या आदेशाची दखल एस.टी.महामंडळही होत नसल्याने आदेशाचे फलक शोपीस ठरत आहे.