खरेदी-विक्री संघांना शेतमाल तारण योजना लागू करणार 

0
पणन महासंघाच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश 
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना राबवली जाते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खरेदी-विक्री संघांना ही योजना लागू करण्याचे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ व पणन संस्थांची शिखर संस्था आहे. हमी भावाने भरड धान्य व धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. राज्याच्या समृद्धीसाठी पणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे देखील देशमुख यांनी सांगितले.
राज्य पणन महासंघाच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. २०१८ च्या खरीप हंगामातील मूग, उडीद पिकांची आवक बाजारात नुकतीच सुरू होत आहे. या पिकांचा बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे. याबाबत खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. २०१७-१८ या वर्षात राज्यातील १३८ बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेची अंमलबजावणी केली आहे. सुमारे २.१५ लाख क्विंटल शेतमालाची साठवणूक करुन शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल साठवण्यासाठी संबंधित बाजार समितीशी त्वरित संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने त्यांचा शेतमाल विक्री करु नये. ज्या बाजार समित्या शेतमाल तारण कर्ज देत नाहीत, अशा बाजार समित्यांची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा उप निबंधकांकडे करावी, असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले.
देशमुख म्हणाले, राज्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात होते या उत्पादनाचे महाराष्ट्राच्या नावाने ब्रॅण्ड विकसित होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेऊन खरेदी विक्री संघाने कार्य केले पाहिजे. विविध कार्यकारी संस्थांनी शेतकऱ्यांना सभासद करुन घ्यावे. गाव समृद्ध झाले तर राज्य समृद्ध होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाकडे अधिक लक्ष देऊन महासंघाने कार्य करावे, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
Copy