खरीप पेरणीसाठी प्रति हेक्टर 15 हजार रूपये बिनव्याजी कर्ज द्यावे

0

शिरपूर: अतिवृष्टीमुळे गेल्यावर्षी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बीसाठी तर धुळे जिल्ह्यात पीकविमा भरून घेण्यासाठी कंपनीच पुढे न आल्याने विमा मिळण्याचीही शक्यता नाही. राज्य शासनाने या बाबींचा विचार करून शेतकर्‍यांना विनाअट बिनव्याजी 15 हजार रुपये प्रति हेक्टर कर्ज देण्याची मागणी भाजपाचे धुळे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल पत्राद्वारे केली आहे.

खत, बी, बियाणांची विक्री सुरु झाल्यानंतर दरवर्षीचा अनुभव पाहता विक्री केंद्रांवर मोठी गर्दी होऊ शकते. म्हणून शेतकर्‍यांना बांधावर खते, बी, बियाणे देण्याचे कृषीमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना बांधावर खत, बी, बियाणे मिळालेच पाहिजे. यासाठी उपाययोजना करण्यात यावी व सरकारने कर्जमाफी जाहीर केली असून सुध्दा अद्यापही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तरी कर्ज माफीचे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बबनराव चौधरी यांनी केली आहे.
पेरणीला अजून 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी आहे. वेळीच योग्य पावले उचलून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. तसेच शेतकरी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्न झालेला शेतमाल शेतकर्‍यांकडेच असल्याने तो माल विकता यावा यासाठी जिल्हातील काही बंद बाजार समित्याही सोशल डिस्टन्सिंग ठेवुन सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात नमूद आहे.

Copy