खराबवाडीत आढळला रंग बदलणारा हिरवा सरडा

0

चाकण : विचित्र रंग, रूप आणि संथ चाल यामुळे निसर्गातील शत्रूंसह मानवाच्या हातून मारला जाणारा दुर्मिळ हिरवा सरडा चाकण (ता.खेड) जवळ खराबवाडी येथे सापडला आहे. पूर्ण वाढ झालेला हा सरडा फ्रेंड्स ऑफ नेचरच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या स्वाधीन केला असून त्याची रवानगी वनहद्दीतील जंगलात केली जाणार आहे.

हिरव्या रंगाचा शॅमेलियन सरडा
विशिष्ट जातीचा सरडा रंग बदलतो हे सर्वश्रुत आहे. मात्र, रंग बदलणार्‍या सरड्यांच्या तब्बल दीडशेहून अधिक प्रजाती आहेत. यामध्ये गुलाबी, निळा, लाल, निलमली, पिवळा, हिरवा या रंगाचे सरडे अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे हिरव्या रंगाचा सरडा अतिशय दुर्मिळ समजला जातो, असाच दुर्मिळ असलेला हिरव्या रंगाचा शॅमेलियन सरडा खराबवाडी (ता.खेड) येथे आढळून आला आहे. इतर चपळ सरड्यांच्या तुलनेत अतिशय संथ असल्यामुळे सहज मारला जाणारा हिरवा सरडा दुर्मिळ झालेला आहे.

दुर्मिळ असल्याने जपवणूक करण्याची आवश्यकता
या सरड्याला लाभलेली निसर्गदत्त देणगी म्हणजे झाडे आणि पाने, गवताच्या रंगानुरुप तो रंग बदलू शकतो. त्याचे कारण म्हणजे नैसर्गिक रंगात मिसळून गेल्याने शत्रूपासून संरक्षण करता येते. त्वचेखाली असलेल्या रंगद्रव्यांमुळे तो रंग बदलू शकतो. तथापि, त्याचा मूळ रंग हिरवा आहे. ग्रामीण भागातील लोक त्यास घुमा व घोयरा असेही म्हणतात. सुमारे 15 से.मी. लांबीच्या या सरड्याचे मुख्य खाद्य किडे व फूलपाखरू आहे. हिरवा शॅमेलियन सरडा दुर्मिळ असल्याने त्याची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. डोळे फुंकतो, आंधळेपणा येतो, चावा घेतल्यास मृत्यू येतो, असे काही गैरसमज या सरड्याच्या बाबत असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व फ्रेंड्स ऑफ नेचरचे बाप्पुसाहेब सोनवणे यांनी सांगितले.