खडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या !

0
अमित महाबळ: गेल्या काही वर्षापासून भाजपाचे  ज्येष्ठ (?) नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कमालीचे अस्वस्थ आहेत. पक्षातील काहींविषयी त्यांच्या मनात राग आहे आणि तो लपूनही राहिलेला नाही. आज त्यांची जी स्थिती झाली आहे ती होण्यामागे हे लोकच कारणीभूत असल्याचा खडसेंचा दावा राहिला आहे. त्यांचा हा रोख मुख्यत्वे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे दिसून येते. गेल्याच आठवड्यात ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्यानंतर खडसे पुन्हा एकदा बोलते झाले. त्यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा कसा घेतला गेला? राज्यपालपदासाठी फडणवीसांनी त्यांच्याच मुलीची कशी शपथ घेतली? माझ्यावर सातत्याने कसा अन्याय केला जात आहे? याचा पाढाच खडसे यांनी पुन्हा एकदा वाचला. पुस्तक प्रकाशनावेळी जनतेचा अंदाज होता की, या पुस्तकामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडेल. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.  खडसे साहेबांवरील अन्याय दूर व्हावा, त्यांना न्याय मिळावा अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा असेल, तर महाराष्ट्रातील आताची दोन ठळक उदाहरणे त्यांनी
नजरेसमोर ठेवावीत.

कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील सत्य खोदून बाहेर काढण्यासाठी हिंदी मीडियाने हा विषय आक्रमकपणे लावून धरला. त्यामुळेच ड्रग्ज व्यवसायाचा नवीन पैलू उघड झाला.  सुरुवातीला या प्रकरणात काहीच दम नसल्याचे अनेकांना वाटत होते. त्यामुळे हे प्रकरण गुंडाळलेही गेले असते. दुसरे प्रकरण बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचे आहे. बृहन्मुंबई महापालिकेने या अभिनेत्रीच्या कार्यालयाचे कथित अतिक्रमण हटविण्याची कारवाई चुकीच्या पद्धतीने केली आणि हा मुद्दा हिंदी मीडियाने डोक्यावर घेतला. कंगनावर अन्याय झाल्याची बोंबाबोंब झाली. शिवसेना पुरती खिंडीत गाठली गेली आणि त्यांच्या नेत्यांना मग यातून बाहेर निघण्यासाठी ठाकरे बँ्रडची आठवण झाली.

खडसेेंकडे मंत्रिपद असताना त्यांचा मुंबई-जळगाव-मुंबई प्रवास व्हायचा. जोपर्यंत ते मंत्रिपदावर होते तोपर्यंत त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी व्हायची. पण मंत्रिपद गेल्यानंतर खडसे यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाणार्‍यांमध्ये दोन-चार निवडक कार्यकर्तेच दिसू लागले. खडसेंकडील मंत्रिपद गेले. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट त्यांची मुलगी अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांना देण्यात आले पण तोही पक्षाचा खेळ होता का ? कारण, मंत्रिपदानंतर आमदारकीही घरातून गेली. या सर्वांबद्दल खडसे साहेब अधून-मधून बोलत असतात, आपला संताप व्यक्त करतात. पक्षाला 40 वर्षात कसे मोठे केले? त्यासाठी  किती कष्ट घेतले ? याच्या आठवणी लोकांना ऐकवतात. पण आता ते पक्षाला नको आहेत हे कटू सत्य स्वतः खडसेंनी स्वीकारायला हवे. अन्यथा एव्हाना पक्षाकडूनच त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे होते.

खडसेंचा संताप फडणवीस यांच्याविरोधात आहे. मात्र, त्यांना दिल्लीतून ग्रीन सिग्नल असल्याशिवाय खडसेंवर, अशी आफत आणली जाणे शक्यच नाही याचाही विचार झाला पाहिजे. खडसेंनी पक्ष मोठा केला. तो काळ संपला. तेव्हाचे काही नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे अन्याय होत असतानाही केवळ भावनिक मुद्यावर खडसेंनी पक्षात गुंतून राहणे योग्य नाही. घरचेच वैरी झाले म्हटल्यावर त्या घरातच राहण्यात काय अर्थ आहे? विधानसभेलाच खडसेंनी वेगळा विचार केला असता, तर कदाचित संधीचे सोने झाले असते. अगदी सुरुवातीला खडसे साहेबांचा उल्लेख करण्यापूर्वी ज्येष्ठ या शब्दानंतर कंसात प्रश्नचिन्ह दिले आहे.  खडसे साहेब माझा पक्ष म्हणतात परंतु, याच पक्षातील आताच्या पिढीने त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवला आहे का ? अन्यथा आतापर्यंत मुख्यमंत्रिपद वा राज्यपालपद देऊन किंवा केंद्रात संधी देऊन त्यांचा उचित सन्मान राखला गेला असता.

Copy