खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली

0

मुंबई – पक्षात सातत्याने डावलण्यात येत असल्याने नाराज असलेले एकनाथराव खडसे यांचे विधान परिषदेचे तिकिट देखील कापण्यात आल्याने त्यांनी पुन्हा एकदा नाराजीची तलवार उपसत पक्षावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे.
निष्ठावंतांना तिकीटे नाकारली जातात आणि बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते, असा आरोप करत खडसेंनी मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली होती. त्यावर खडसेंना आतापर्यंत खूप काही दिले आहे. खडसे सातवेळा आमदार झाले. दोनवेळा त्यांना मंत्रिपद मिळाले. त्यांच्या सुनेला दोनदा खासदारकी मिळाली. मुलीला जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद मिळाले. खडसे यांच्या पत्नीला महानंदाचे अध्यक्षपद देण्यात आले, असे म्हणत पाटील यांनी खडसे कुटुंबाला मिळालेल्या सगळ्या पदांची यादीच वाचून दाखवली.

तेव्हा हरीभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?

पाठीत खंजीर खुपसल्याची भावना खडसेंनी व्यक्त केली होती. त्यावरुनही पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले होते. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी हरीभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? जगवानी यांना देण्यात आलेले विधान परिषदेचे तिकीट कापून खडसेंनी मुलाला उमेदवारी दिली. तेव्हा तुम्ही जगवानी यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?, असे प्रश्न पाटील यांनी विचारले.

खडसेेंचे पुन्हा जोरदार प्रतिउत्त्तर

चंद्रकांत पाटील यांना खडसेेंनी पुन्हा जोरदार प्रतिउत्त्तर दिले आहे. तुम्ही माझ्यावर घराणेशाहीची टीका करता. माझ्या घरात केवळ मला आणि सुनेलाच तिकीट देण्यात आलं, असं म्हणत खडसेंनी भाजपामधल्या घराणेशाहीची यादीच वाचली. देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. देवेंद्र मुख्यमंत्री होते. त्याआधी आमदार राहिले. त्यांच्या काकू मंत्री होत्या. २६ वर्ष आमदार होत्या. ही घराणेशाही नाही का?’ असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. रावसाहेब दानवे मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पाटलांच्या घरात आमदारकी खासदारकी आहे. याला घराणेशाही म्हणायचे नाही, मग काय म्हणायचे, असा सवालदेखील खडसेंनी विचारला.