खडसेंना दिलेल्या दिव्यांग दाखल्याची चौकशी करा

शिवसेनेचे गजानन मालपुरे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जळगाव – राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडे माहिती अधिकारात माहिती मागविली आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे अपंगत्वाचा दाखला आला कुठून? असा प्रश्न उपस्थित करून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क खडसेंच्या अपंगत्वाचा दाखलाच प्रसारमाध्यमांसमोर दाखविला होता. आता या प्रकरणात शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी अधिक माहिती घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज केला आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, एकनाथराव खडसे हे राज्यातील वजनदार नेते आहेत. त्यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना दि. ६ सप्टेंबर रोजी अपंगत्वाचा दाखला देण्यात आला. खडसे हे राजकीय वलय असलेले नेते आहेत. त्यांना शासकीय खर्चाने संरक्षण दिले जात आहे. दि. ६ सप्टेंबरपर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दिली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवर्‍यात आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून खोटे प्रमाणपत्र दिलेले असल्यास अधिकारी व तज्ञ डॉक्टर यांच्यासह माजी मंत्री खडसेंवर कारवाई करावी अशी मागणी गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Copy