एकनाथराव खडसेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी मैदानात

मुंबई : सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) राष्ट्रावादीचे नेते एकनाथराव खडसे यांची चौकशी सुरु केल्यानंतर खडसे यांची पाठराखण करताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या संबंधीच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. एकनाथराव खडसे यांच्यावर ज्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, त्यात अद्याप कोणतेही तथ्य आढळलेले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली होती, त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. असं असतानाही कुभांड रचून केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत त्यांना राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिलं गेलं नाही. ओबीसी नेतृत्व असल्यानं त्यांना बाजूला करण्यात आलं. आता त्यांना राष्ट्रवादीत सन्मानानं प्रवेश दिल्यानं चिडून जाऊन भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खडसेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवत आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Copy