खडसेंचे काय चुकले हे भाजपने सांगावे: मंदाताई खडसे

0

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल भाजपला रामराम ठोकला आहे. उद्या शुक्रवारी २३ रोजी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे स्वागत केले आहे. दरम्यान त्यांच्या पत्नी जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या  चेअरमन मंदाताई खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘नाथाभाऊ खडसे यांनी ४० वर्ष भाजपच्या माध्यमातून जनसेवा केली, त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपातून काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र तरीही भाजपने त्यांचा पुनर्वसन केले नाही. नेमके त्यांचे काय चुकले हे आतातरी भाजपने सांगावे’ असे प्रतिक्रिया मंदाताई खडसे यांनी दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या.

घरावर तुळशी पत्र नाथाभाऊंनी पक्षासाठी काम केले आहे. मुलांना, परिवाराला त्यांनी वेळ दिला नाही, तितका वेळ पक्षाला दिला असे असतांनाही ही वेळ आली हे आमच्यासाठी दुर्दैवी असल्याचे मंदाताई खडसे यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे हे मला व्हिलन बनवत आहे, मात्र ते अर्धसत्य सांगत आहेत. वेळ आल्यावर सांगेल असे फडणवीस सांगत आहे. यावर एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी अर्धसत्य सांगत असेल तर सत्य काय आहे? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असा सवाल खडसे यांनी केला आहे.