खंडेरावनगरातील नाल्यात आढळला अनोळखी मुलीचा मृतदेह

जळगाव । रामानंदनगराच्या उताराजवळील नाल्यात 15 ते 18 वयोगटातील एक अनोळखी अल्पवयीन तरुणी बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वाहून गेली आहे. तिचा मृतदेह हरिविठ्ठलनगराजवळील खंडेरावनगराच्या पुलाजवळ दुपारी 3 वाजेच्या सुमारास आढळला. शहरात मंगळवार व बुधवारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे रामानंदनगराच्या उताराजवळील नाल्याच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. या नाल्याच्या परिसरात अनेकदा छोटे-मोठे मुलं काही वस्तूंच्या शोधात फिरत असतात. नाल्यात वाहून आलेली वस्तू पकडण्याच्या प्रयत्नात ही मुलगी नाल्याच्या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहात वाहून गेली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. नाल्यात मुलीचा मृतदेह आढळल्याचे कळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केला आहे. या मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Copy