खंडणीची मागणी करण्याऱ्या दोघाजणांवर गुन्हा दाखल

0

चाकण : औद्योगिक वसाहतीतील म्हाळुंगे इंगळे हद्दीतील बजाज कंपनीतून लाकडी भंगार माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून वीस हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरारी झाला आहे. जीशान मेहमूद अली (वय 25) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय नामदेव काचळे व आल्हाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जीशान अली हा आयशर टेम्पो (एमएच14 सीटी 3942) घेऊन टेम्पो चालक सेसमंत चौधरी याच्या समवेत बजाज कंपनीमध्ये आला. या कंपनीत लाकडी भंगार माल भरून टेम्पो बजाज कंपनी रोडवरून निघोजे रोडने कुदळवाडी येथे निघाला होता. ठाकरवाडीजवळ एक मोटरसायकल चालकाने (एमएच 14 सीझेड 6382) दुचाकी टेम्पोला आडवी घालून टेम्पो थांबवला.

त्यावेळी फिर्यादी अली याने त्यास विचारणा केली असता, येथील कंपन्यांकडून लाकडी भंगार खरेदी करण्याचे ठेके आम्ही घेतो. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पैशांनी लाकडी बॅलेट खरेदी करता. त्यामुळे मला आता वीस हजार रुपये दिले तरच मी तुमचा टेम्पो पुढे जाऊ देईन असे सांगितले. त्यानंतर एका मोटारीतून आलेल्या आल्हाट नामक इसमाने सुद्धा टेम्पोच्या समोर आपली मोटार उभी केली. त्यानंतर टेम्पोच्या चालकाने पैसे नाहीत. जाऊ द्या, अशी विनवणी केली. मात्र संबंधित इसमांनी दमदाटी सुरु केली. अखेरीस टेम्पो चालक आणि फिर्यादी यांनी टेम्पोचे मालक सौरभ अली यांना माहिती दिली. सौरभ अली यांनी चाकण पोलीस ठाण्यात फोन केला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी अक्षय नामदेव काचोळे यास ताब्यात घेतले. त्यावेळी मोटारीतील आल्हाट याने मोटार घेऊन तेथून पोबारा केला. उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Copy