Private Advt

क्षणात गाठले मृत्यूने : भुसावळातील अपघातात जळगावातील वाहन मालकाचा जागीच मृत्यू

उभ्या तीन वाहनांवर डंपर धडकल्याने भीषण अपघात : चौघे गंभीर, एकाची प्रकृती अत्यवस्थ ; भरधाव धावणार्‍या डंपरांवर आरटीओ विभागाने कारवाई करण्याची मागणी

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन वाहनांवर भरधाव डंपर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात जळगावातील वाहन मालकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. सोमवार, 11 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा विचीत्र अपघात घडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली आहे. या अपघातात सुनील जुलाल पाटील (45, मूळ रा.कुरंगी, ता.पाचोरा, ह.मु.शिवधाम मंदिर, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सुनील पाटील हे यांचे महामार्गावर त्यांचे वाहन नादुुरुस्त असल्याने त्यास टोचन लावण्यासाठी वाहनाखाली जाताच भरधाव डंपर वाहनावर आदळला.

वाहनाला टोचन लावत असतानाच विचीत्र अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील पाटील यांचे टाटा कंपनीचा 909 ट्रक (एम.एच.04 डी.डी.2540) असून दररोज त्याद्वारे विकास दुधा खंडवा येथे पोहोचवले होते. तीन दिवसांपूर्वी वाहनात बिघाड झाल्याने वाहन खंडवा येथेच पडून होते तर नादुरुस्त वाहन दुरुस्त करण्यासाठी पर्यायी 407 (एम.एच.04 ई.एल.7237) ही सोमवारी खंडवा येथे दुध पुरवठ्यासाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात नादुरुस्त वाहनाला टोचन करून जळगावात आणण्यात येत होती. भुसावळ आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरजवळील हॉटेल वरूण समोर अचानक गाडीचे टोचन (लोखंडी क्लॅम) अचानक तुटले व ते वाहनांवरील चालकांना जोडता येत नसल्याने त्यांनी ही बाब टाटा ट्रक मालक सुनील पाटील यांना कळवली. त्यानंतर पाटील हे आपली चारचाकी इंडिगो (एम.एच.45 एन.4367) ने ट्रामा केअर सेंटरजवळ सोमवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास आले व त्यांनी वाहनांच्या विरूद्ध दिशेने गाडी उभी केली व टोचन लावण्यासाठी ते ट्रकखाली शिरताच त्याचवेळी गिट्टी वाहून नेणारा भरधाव डंपर (एम.एच.19 डी.यु.5895) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने नादुरुस्त ट्रकसह 407 व चारचाकीला धडक दिल्याने सुनील पाटील हे जागीच ठार झाले तर अन्य चालकांसह चौघे जखमी झाले.

क्षणात गाठले मृत्यूने : चौघे जखमी
भरधाव डंपरचा वेग इतका प्रचंड होता की टाटा ट्रकचा अक्षरशा चेंदामेंदा झाला तर वाहन चालक पाटील यांचा जागीच जबर धडकेने मृत्यू ओढवला तर 407 चालक सोनू अशोक गावंडे (26, जळगाव), टाटा ट्रक चालक सुनील (छोटे) खरे (36, जळगाव) व क्लीनर कल्पेश गुलाब सपकाळे (30, हुडको, जळगाव) हे जखमी झाले तसेच अपघाताला कारणीभूत असलेला डंपरवरील सोनवणे नामक चालकही जखमी झाला. धडक इतकी जोरदार होती की महामार्गावरील रेलिंगही तुटल्याने मोठे नुकसान झाले तर वाहनांचे ऑईल रस्त्यावर सर्वत्र विखुरले. सुरुवातीला चौघांना भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले असता सुनील पाटील यांना मृत घोषित करण्यात आले. डॉ.मयूर चौधरी, डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ.आसीफ शेख, डॉ.शिवाजी गवळी, डॉ.राहिला शेख यांनी तिघा जखमींवर तातडीने उपचार केले तर कल्पेशची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अधिक उपचारार्थ जळगावात हलवण्यात आले.

पोलिस प्रशासनाची धाव : वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती कळताच भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, शहर वाहतूक शाखेचे हवालदार अजय भोंबे, हवालदार प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल दिनेश पाटील तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आदींनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारार्थ हलवण्याकामी मदत केली तर स्थानिक नागरीकही मदतीसाठी धावून आले. रात्री उशिरा डंपर चालक सोनवणेविरोधात (नाव, गाव पूर्ण माहित नाही) तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.