क्वारंटाईन सेंटरमधील हमाल उपाशी

0

जळगाव- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धान्य गोदामात काम करणारे 25 ते 30 हमाल महापालिकेच्या केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हमालांना जेवण देखिल लवकर मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान इन्सीडंट कमांडर आणि नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती घेऊन या सर्व हमालांचे स्वॅब घेत त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या.
जिल्हा पुरवठा विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोडावून आहेत. याठिकाणी 25 ते 30 हमाल काम करतात. हे हमाल जिल्हाभरातील शासकीय गोदामात माल पाठविण्याचे काम करतात. अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शासनाकडून आलेली पोती उतरविणे, मागणीनुसार जिल्हयातील प्रत्येक रेशन दुकानदाराच्या मालाप्रमाणे पोती वाहनात भरण्याची ते कामे करतात. या हमालांपैकी एकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने तो कामावर येत नाही.आपल्याला त्रास नको म्हणून या हमालांनी स्वतःहून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी धाव घेतली. वास्तविक अत्यावश्यक सेवेतील ही माणसे असल्याने त्यांचा अगोदर स्वॅब घेऊन त्यांना मोकळे केले पाहिजे. मात्र तसे न करता त्यांना तेथेच दाखल करून घेतले. आज सकाळचा नाश्ता त्यांना चक्क साडेदहाला मिळाला. जेवणही लवकर मिळाले नसल्याने हमालाच्या मालकाने यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
हमालांवर आरोप
आमचे स्वॅब अगोदर घ्या व आम्हाला सोडा असे हमालांनी डॉ.ठुसे यांना सांगितले. त्यांनी तो प्रकार महापालिकेचे डॉ.रावलानी यांना सांगितला. डॉ.रावलानी यांनी तालुक्याच्या अधिकार्‍यांना फोन करून ही हमाल माणसे अत्यावश्यक सेवेतील आहेत का? मद्यपान करतात, सिगरेट पितात ? असा आरोप करीत त्यांचे सांगून आताच त्यांचे स्वॅब घेतले जाणार नाही असे सांगितले.आज दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी स्वॅब न घेतल्याचा प्रकार इन्सीडंट कमांडंट, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांना सांगितला. त्यावर त्यांनी तातडीने स्वॅब घेण्याची व्यवस्था केली.

Copy