क्रिकेटसाठी चांगल्या सुविधा नसल्याने शेतात उभारले क्रिकेटचे मैदान

0

नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि फायनल सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युजवेंद्र चहल सध्या फारच चर्चेत आहे. मात्र त्याचा हा प्रवास फारच कठीण असल्याचे समोर आले आहे. क्रिकेटमध्ये इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने अनेक समस्यांचा सामना केला असून सराव करण्यासाठी मैदान देखील नसल्याची माहिती मिळाली आहे. युजवेंद्रच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या इकडे क्रिकेटसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने आम्ही आमच्या शेतातील दीड एकर शेतीत क्रिकेटचे मैदान बनवले. त्यात तो एकटा तासन-तास तेथे सराव करायचा. ज्यावेळी त्याने १९ वर्षाखालील भारतीय संघात स्थान मिळवले तेव्हा मला वाटले की, युजवेंद्र क्रिकेटमध्ये करियर करू शकतो.

पहिले प्रेम क्रिकेट नाही तर बुद्धिबळ
सिंगल हड्डी दिसणारा चहल बौद्धिकदृष्ट्या प्रचंड हुशार आहे. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये देखील धमाल उडवून दिली आहे. मात्र त्याचे पहिले प्रेम क्रिकेट नव्हते तर बुद्धिबळाला चहलची पहिली पसंती होती. चहल राज्य आणि राष्ट्रीयस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन राहिला आहे. त्याने २०१३ चा ज्युनियर चेस वर्ल्ड कप सुद्धा खेळला होता. मात्र, हा खेळ महागडा असल्याने त्याला पुढे कायम करणे शक्य झाले नाही. त्यामुळे दुसरा पसंतीचा खेळ असलेल्या क्रिकेटकडे तो वळला आणि त्याचा खेळ बुधवारी सर्वांनीच पहिला. महत्वाच्या क्षणी ६ गडी बाद करत त्याने इंग्लंडच्या संघाचे कंबरडे मोडले.

युवराज सिंगने घेतली फिरकी
युवराज सिंगने पत्रकार बनून चहलची मुलाखत घेतली. चहलवर गमतीदार प्रश्नांचा भडीमार करत युवीने चहलला भंडावून सोडले. चहलनेही युवराजच्या प्रश्नांना तेवढीच गमतीदार उत्तरे दिली. तुला उचलून घेतल्यावर कसं वाटल? तुझं वजन जास्त आहे की बॉलचं? असे उलट सुलट प्रश्न युवराजने चहलला विचारले. युवराजच्या तुझे वजन जास्त आहे की बॉलचे, या प्रश्नावर बॉलपेक्षा मी नक्कीच वजनदार असेल, असे उत्तर चहलने दिले. तर, मला उचलल्यावर डीडीएलजे या सिनेमाचे फिलींग आल्याचे उत्तर चहलने दिले. बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे.

चहलचा धमाका यादगार
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. या सामन्यात धमाका केला तो चहलने. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. सिंगल हड्डी शरीरयष्टी असलेल्या चहलने धाकड दिसणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशा आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवले. 203 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव केवळ 127 धावातच आटोपला.