क्रमवारीत मरे अग्रस्थानी तर जोकोविच दुसर्‍या स्थानावर

0

पॅरिस । जागतिक टेनिस महासंघाने जाहीर केलेल्या ताज्या एटीपी टेनिस क्रमवारीत स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर व स्पेनचा राफेल नादाल यांनी पुन्हा टॉप ‘फाईव्ह’ मध्ये प्रवेश केला आहे. ताज्या एटीपी क्रमवारीत फेडरर चौथ्या स्थानी तर राफेल नादाल पाचव्या स्थानी विराजमान आहे. ब्रिटनचा अँडी मरे अग्रस्थानी कायम असून सर्बियन नोव्हॅक जोकोविच दुसर्‍या तर स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका तिसर्‍या
स्थानी आहे.

गत महिन्यात झालेल्या माँटे कार्लो टेनिस स्पर्धेतील जेतेपदाचा नदालला फायदा झाला आहे. त्याने दोन स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान मिळवले आहे. ताज्या क्रमवारीत त्याचे 3735 गुण आहेत. याशिवाय, दुखापतीतून जोरदार पुनरागमन केल्यानंतर जेतेपदाचा धडाका लावणारा रॉजर फेडरर पुन्हा एकदा टॉप-5 मध्ये आला आहे. फेडरर ताज्या क्रमवारीत 5125 गुणासह चौथ्या स्थानी विराजमान आहे. याउलट, जपानच्या केई निशिकोरीची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता सातव्या स्थानी आहे. कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने सहावे स्थान कायम राखले आहे. फ्रान्सचा त्सोंगाची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता 2915 गुणासह अकराव्या स्थानी आहे.