कौशल्य विकासामुळेच स्वावलंबी होण्यास मदत

0

 

चाळीसगांव : कौशल्य विकासामुळे उमेदवाराच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्यातील व्यवसाय क्षेत्र निवड, करिअर पसंती ओळखुन तो स्वावलंबी होण्यास मदत होते असे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी आज केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने शहरातील बापजी रुग्णालयाच्या आवारात आयोजित भव्य अशा महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील, सहाय्यक संचालक प्र.ग.हरडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.राजपूत, जिवनदिप कौशल्य विकास संस्थेचे संचालक डॉ.संदीप देशमुख, डॉ.देवरे यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व तालुक्यातील बेरोजगार तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका छताखाली उमेदवारांना रोजगाराची मोठी संधी
सुशिक्षीत बेरोजगार व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनीधी यांना एका छताखाली आणून उमेदवारांमधील कौशल्य ओळखून त्यांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. कौशल्य विकास ही अशी कार्यपध्दती आहे, ज्याचे उद्दिष्ट उमेदवारांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यात वाढ करणे व त्यास योग्य व्यवसाय/क्षेत्र निवडण्यास प्रवृत्त करणे. एखाद्या उमेदवाराच्या करियरच्या पसंतीबाबत मुल्यमापन करुन त्याच्या जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणारी ही अखंड प्रक्रिया आहे. व्यवसाय मार्गदर्शनामुळे व्यक्तिमत्व विकास व नोकरीक्षम कौशल्यामध्ये वाढ होण्यास मदत होऊन जीवनातील प्रत्येक संकटावर मात करणे शक्य होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. हे मेळावे यापुर्वी जिल्हास्तरावर आयोजित केले जात असत त्याला मिळणार प्रतिसाद व उमेदवारांना स्थानिक ठिकाणी सोय व्हावी या उद्देशाने सदर मेळावे तालुका स्तरावर घेण्यात येत आहेत. या महारोजगार मेळाव्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांसह उद्योजकांची देखील मोठ्या प्रमाणात सोय होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणीक प्रमाणपत्र मिळविण्यापुरता मर्यादीत अभ्यासक्रम पुर्ण न करता स्वत:मधील कला गुणांना वाव देऊन कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. शासनामार्फत राबविण्यात येणारा महारोजगार मेळावा हा उपक्रम स्तुत्य असून याचा तालुक्यातील बेरोजगारांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करीत उमेदवारांना भावी वाटचालीस त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी रोजगार मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करतांना सहाय्यक संचालक प्र.ग.हरडे म्हणाले की, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सर्व सुशिक्षीत बेरोजगारांना ( ुुु.ारहरीेक्षसरी.र्सेीं.ळप) हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

223 उमेदवारांची प्राथमिक निवड
या रोजगार मेळाव्यास तालुक्यातील बेरोजगारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तालक्यातील 400 उमेदवारांनी यात सहभाग नोंदविला तर यामध्ये एकूण 223 उमेदवारांची प्राथमिक निवडही यावेळी करण्यात आली. यामध्ये वेरॉक प्रा.लि.औरंगाबाद यांनी आय.टी.आय.प्रशिक्षीत 43 उमेदवारांना, धुत ट्रान्समिशन औरंगाबाद यांनी आय.टी.आय.प्रशिक्षीत 69 उमेदवारांना तर नवनाथ फर्टीलायझर औरंगाबाद यांनी 57, नवकीसान बायोटेक, जळगांव यांनी 32, कोजेट कॉलसेंटर बडोदा यांनी 22 उमेदवारांची जागेवर प्राथमिक निवड करुन नेमणूकीचे आदेश दिले. नेमणूक झालेल्या उमेदवारांना सुमारे 8 ते 10 हजारापर्यंत मासिक वेतनाची सुवर्णसंधी या रोजगार मेळाव्यातून उमेदवारांना मिळाल्याचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांवचे सहाय्यक संचालक प्र.ग.हरडे यांनी कळविले आहे.