कोविड लसीकरणासाठी रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीला परवानगी

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीला कोविड लसीकरणासाठी जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली असल्याची माहिती माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी दिली. लवकरच लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या वतीने समाजोपयोगी विविध उपक्रम राबविल जातात. आरोग्य, स्वच्छता व जनजागृती या विषयावर विविध उपक्रम राबवून भुसावळ ताप्ती व्हॅलीने आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.

नवशक्ति आयुर्वेदालयात लसीकरण केंद्र
शासन स्तरावरून काही सामाजिक संस्थांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात भुसावळ शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांना कोविड-19 लसीकरण केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परवानगी दिली आहे. हे लसीकरण केंद्र नवशक्ति आयुर्वेदालय, टी.व्ही.टॉवर ग्राऊंडजवळ, भुसावळ येथे सुरू करण्यात येणार आहे. हे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी पुढाकार घेतला तर यासाठी उपप्रांतपाल धर्मेंद्र मेंडक, प्रेसिडेंट सुधाकर सनंसे, सेक्रेटरी राम पंजाबी, संजय भटकर, खजिनदार मुकेश अग्रवाल, योगेश इंगळेख, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, किशोर पाचपांडे, सुनील वानखेडे आदींची बैठक झाली.

लसीकरण केंद्र सर्वांसाठी खुले
शहराची लोकसंख्या व त्या तुलनेत लसीकरण केंद्र कमी असल्याने केंद्रावर गर्दी होते तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असल्याने रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या वतीने शहरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची संकल्पना समोर आली. शासनाच्या नियमांचे पालन करून लवकरच लसीकरणाला सुरूवात होणार असल्याचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा म्हणाले.