कोळश्याची चोरटी वाहतूक करताना पोलिसांनी पकडले ट्रॅक्टर : एकाविरोधात गुन्हा

Coal Theft in Deepnagar : Tractor Seized : Crime Against Driver Of Fekary भुसावळ : पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने दीपनगरातील बॉयलरसाठी लागणार्‍या कोळश्याची चोरी करताना ट्रॅक्टर पकडले असून 12 हजार रुपये किंमतीचा दोन टन कोळसा जप्त केला आहे तर दोन लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले. या प्रकरणी नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक सचिन उत्तम सुरवाडे (झेडटीएस, फेकरी, साळवे नगर, भुसावळ) याच्याविरोधात बुधवारी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दीपनगरातील कोळश्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकातील हवालदार नंदकुमार सोनवणे, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी यांनी फेकरी बसस्थानकासमोरील बोगद्याच्या आडोशाला बुधवार, 22 रोजी मध्यरात्री ट्रॅक्टर (एम.एच.25 एच.426) येताच ते थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर त्यात कोळसा आढळल्याने चालक सचिन सुरवाडे यास विचारणा केली असता त्याने कुठलेही उत्तर न दिल्याने लेखी समज देण्यात आल्यानंतर ट्रॅक्टर जप्त करण्यात आले मात्र चालक न आल्याने ट्रॅक्टरमधील दोन टन कोळसा चोरीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.