कोरोना रुग्णांना जेवण देण्यासाठी नातेवाईकांच्या रुग्णालयासमोर लागल्या रांगा

गोंधळामुळे पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

जळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काविड रुग्णालयातील कोरोना रुग्णांना जेवणाचा डबा देण्यासाठी रविवारी रांगा लागल्या. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रुग्णालयातील प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागली. बर्‍याच वेळाने नातेवाईकांना डबा द्यायला जाऊ देण्यात आले. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. तर काही नातेवाईक सिरियस रुग्णांना भेटण्यासाठी पीपीई किट परिधान करुन आत गेले. याप्रकरामुळे बराच वेळ गोंधळ झाला.
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून काही निर्णय जाहीर केले. कोविड सेंटरमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी, त्यांना जेवण देण्याकरिता थेट नागरिक आत जातात. रुग्णालयासमोर देखील नातेवाईकांची गर्दी उसळते. त्यामुळे नातेवाईकांना संसर्गाची भीती असते. हा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कोविड रुग्णालय व परिसरातील गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहेत. नातेवाईकांनी रुग्णाला भेटण्यासाठी थेट आत जाऊ नये. रुग्णालयात रुग्णांच्या देखभालसाठी बेड असिस्टंट व इतर कर्मचारी आहेत. ते रुग्णांचे बोलणे त्यांच्या नातेवाईकांशी करुन देतील. रुग्णांना जेवणाचा डबा व काही द्यायचे असल्यास ते कर्मचार्‍यांमार्फत देण्यात यावे. रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांशी व्हीडीओमार्फत कर्मचार्‍यांनी बोलणे करुन द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अमलबजावणी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.
संसर्ग रोखण्याचा प्रयत्न—-
रुग्णालयात थेट नातेवाईक जात असल्याने किंवा बाहेरील गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. तो टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी काही आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अमलबजावणी प्रशासन करीत आहे. कोरोना रुग्णांसाठी सेवालय, वॉर रुम, बेड मॅनेजमेंट आणि डेथ कमेटी कार्यरत आहे. नातेवाईकांनी दिलेला जेवणाचा डबा कर्मचार्‍यांमार्फत रुग्णांपर्यंत टप्या टप्याने पोहचविण्यात येत आहे. तसेच व्हीडीओ कॉलच्या सहाय्याने नातेवाईकांचे बोलणे रुग्णांशी करुन देण्यात येत आहे. तर गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना विशेष खबरदारी घेवून रुग्णालयात जाऊ देण्यात येत आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.