कोरोना योध्दा ‘आशा स्वयंसेविके’ला घर पेटवून देण्याची धमकी

0

जळगाव- दोघांना मास्क न लावता विनाकारण का बसले? असे बोलल्याने त्याचा राग येवून सर्वेक्षण करणार्‍या आशा स्वयंसेविका विजया पुंडलिक बोरसे वय 39 रा. धानवड ता.जळगाव हिला दोघांनी शिवीगाळ करत घर पेटवून टाकू अशी धमकी दिल्याची घटना 29 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास धानवड गावातील इंदिरानगरात घडली. याप्रकरणी विजय शिवदास पाटील, रविंद किसन पाटील रा. धानवड या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धानवड येथील रहिवासी विजया बोरसे या अंगणवाडी सेविका आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जळगाव तालुक्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आशा स्वयंसेविकांना सर्व्हेक्षण करण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार बोरसे ह्या बुधवारी रेखा लोखंडे व नेत्रा पाटील या आशावर्कर सोबत धानवड गावात सर्व्हेक्षण करत होत्या. सकाळी 9 वाजेच्या सुमारास इंदिराभागात सर्वेक्षण करत असतांना त्यांना विजय शिवदास पाटील, रविंद्र किसन पाटील दोघेही तोंडाला मास्क न लावता स्वामी समर्थ किराणा दुकानाजवळ विनाकारण बसलेले दिसून आले.

हातातील सर्वेक्षणाचे रजिस्टरही फेकले
विजया बोरसे दोघांना मास्क न लावता विनाकारण का बसले आहात, असे म्हटल्या. त्याचा राग आल्याने विजय पाटील व रविंद्र पाटील या दोघांनी बोरसे यांच्या हातातील सर्वेक्षणाचे रजिस्टर जमीनीवर फेकून दिले. तसेच तु कशी काम करते, तुला पाहून घेवू, तुझे घर पेटवून टाकू अशी धमकीही दोघांनी बोरसे यांना दिली. या धमकीमुळे विजया बोरसे या घाबरल्या होत्या. त्यांनी फोनवरुन हा प्रकार त्यांचे वरिष्ठ पर्यवेक्षिका भारती गुरव यांना कळविला. त्यांच्या सुचनेनुसार तालुका पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार विजय शिवदास पाटील व रविंद्र किसन पाटील दोघे रा. इंदिरानगर धानवड यांच्याविरोधात धमकी शिवगीळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy